अ.भा.वि.प.च्या वतीने एम्.बी.बी.एस्.च्या प्रथम वर्ष परीक्षेच्या परिपत्रकाची होळी
सांगली, २ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणार्या प्रथम वर्ष एम्.बी.बी.एस्.च्या परीक्षा फेब्रुवारी मासात घेण्यात याव्यात अशा प्रकारच्या सूचना राष्ट्रीय वैद्यकीय आयोग यांनी दिल्या आहेत. तरीसुद्धा महाराष्ट्र्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने या परीक्षा ७ डिसेंबर या दिवशी घेण्यात येत आहेत. अद्याप प्रथम वर्ष वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे शिक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने २ डिसेंबर या दिवशी टिळक चौक येथे एम्.बी.बी.एस्.च्या प्रथम वर्ष परीक्षेच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.
या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे, जिल्हा संयोजक जयदीप पाटील, महानगर मंत्री विशाल जोशी, बाहुबली छत्रे, माधुरी लड्डा, रोहन भोरवत, रोहन कडोले, पुष्पक चौगुले, अनुजा विभूते यांसह अन्य उपस्थित होते.