आष्टा-ईश्वरपूर रस्त्यावरील खड्ड्यांनी पुन्हा घेतला एकाचा बळी !
नागरिकांनी वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
आष्टा (जिल्हा सांगली) – आष्टा-ईश्वरपूर रस्त्यावरील खड्ड्यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी पुन्हा एकाचा बळी घेतला. रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी गेल्याने तोल जाऊन डांबरी रस्त्यावर पडल्याने डोक्याला मार लागून उदय बाळासो गायकवाड (रा. अंकलखोप) यांचा मृत्यू झाला. ते कर्मवीर नागरी सहकारी पतसंस्था सांगली येथे विभागीय अधिकारी या पदावर काम करीत होते. २८ नोव्हेंबर या दिवशी अपघात झाला होता. या अपघाताची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली आहे.
या मासात खड्ड्यांमुळे दोघांना जीव गमवावा लागला आहे. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासन आणखी किती बळींची वाट पहात आहे ?, अशी संतप्त भावना प्रवासी आणि नागरिक यांच्याकडून व्यक्त होत आहे.
दोषी अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झालाच पाहिजे ! – सतीश साखळकर, सर्वपक्षीय कृती समिती, सांगली जिल्हा
सत्ताधारी विकास महाआघाडी वर्षपूर्ती साजरी करत आहे आणि विरोधी पक्ष त्यांना केवळ नावापुरताच विरोध करत आहे. सामान्य जनता मात्र रस्त्यावरील खड्ड्यांत पडून मृत्यूमुखी पडत आहे. मुंबई उच्च न्यायालयातील निर्णयाप्रमाणे दोषी अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केली.