मालवण-कसाल आणि मालवण-कुडाळ या मार्गांवर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याची युवक काँग्रेसची मागणी
मालवण – तालुक्यातील मालवण-चौके-कुणकवळे-कसाल आणि मालवण-धामापूर-कुडाळ या दोन्ही महत्त्वाच्या मार्गांवर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत, अशी मागणी कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा पल्लवी तारी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. असे असतांना स्थानिक जनतेसह पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा निर्माण करणे हे प्रशासनाचे काम आहे. पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊनही स्वच्छतागृहांसारख्या प्राथमिक सुविधांसाठी मागणी करावी लागणे, प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ? – संपादक)
या निवेदनात तारी यांनी म्हटले आहे की, मालवणमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येतात. हे पर्यटक कसाल-मालवण आणि कुडाळ-मालवण या २ मुख्य मार्गांवरून मालवण येथे येतात. या दोन्ही मार्गांवर रहदारी अधिक असते, तसेच या मार्गांवर आवश्यक स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्यामुळे पर्यटक, वाहनधारक, तसेच प्रवाशांची खूप मोठ्या प्रमाणावर असुविधा होते. त्यामुळे या दोन्ही मार्गांवर काही मोक्याच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारावीत. या वेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे जिल्हा सचिव बाळू अंधारी उपस्थित होते.