पदयात्रेच्या वेळी कायद्याचा भंग केल्याविषयी ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ संघटनेच्या विरोधात आमदार फ्रान्सिस्को पाचेको यांची तक्रार
अशी तक्रार का करावी लागते ? प्रशासनाला एखादी संघटना नियमबाह्य कृती करत असल्याचे का लक्षात येत नाही ?
मडगाव, १ डिसेंबर (वार्ता.) – ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ या संघटनेने २७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत निषेध आंदोलन म्हणून पदयात्रा काढतांना कायद्याचा भंग केल्याचा दावा करत बाणावली आणि नुवे मतदारसंघाचे माजी आमदार फ्रान्सिस्को झेवियर पाचेको यांनी या संघटनेच्या विरोधात तक्रार केली आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, ‘‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ संघटनेने त्यांच्या पदयात्रेच्या वेळी लक्ष वेधून घेण्यासाठी लहान मुलांचा उपयोग केला. लहान मुलांनी पदयात्रेत सहभाग घेणे लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे. राजकीय कारणासाठी ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ मुलांना फसवत आहे, तसेच लहान मुलांच्या मनात इतर राजकीय पक्ष आणि बिगर सरकारी संस्था यांच्याविषयी द्वेष निर्माण करत आहे. राष्ट्रीय महामार्गावर पदयात्रा काढण्यासाठी त्यांनी अनुमती घेतली नव्हती. पदयात्रेच्या वेळी २७ नोव्हेंबरला पत्रादेवी नाका ते कोलवाळ, २८ नोव्हेंबरला कोलवाळ ते पणजी, २९ नोव्हेंबरला पणजी ते आगशी या दिवशी त्यांनी अनुमती घेतली होती; परंतु ३० नोव्हेंबरला आगशी ते मडगाव कदंब बसस्थानक या मार्गावर पदयात्रेसाठी संबंधित अधिकार्यांची अनुमती घेण्यात आली नव्हती. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दक्षिण गोव्यात लागू करण्यात आलेल्या १४४ कलमाचा भंग केला आहे. हे कलम लागू करण्यात येऊनही त्यांनी पदयात्रा काढली. (हे आमदार फ्रान्सिस्को झेवियर पाचेको यांच्या लक्षात आले, ते कलम १४४ लागू करणार्या प्रशासनाच्या का लक्षात आले नाही ? मग हे कलम लागू करून काय लाभ झाला ? – संपादक) संघटनेचे कार्यकर्ते त्यांच्या भाषणामधून धार्मिक तेढ निर्माण करत असून त्यांची भाषणे द्वेष पसरवणारी आहेत. छुप्या राजकीय हेतूसाठी ही संघटना धार्मिक संघर्षाचा उपयोग करत आहे. २७ नोव्हेंबर रोजी या संघटनेचे कार्यकर्ते पत्रादेवी येथील मंदिरात देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी थांबले; परंतु ते जेव्हा बांबोळी येथील होली क्रॉस (फुलांचो क्रॉस) या ठिकाणी पोचले, तेव्हा त्यांनी कोणताही मान ठेवला नाही. त्या वेळी या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी ते शांतता न बाळगता घोषणा देत होते, इतर गाणी म्हणत होते.’’ ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ या संघटनेच्या निषेधयात्रेची चौकशी करण्यात येऊन संघटनेवर कारवाई व्हावी, अशी मागणी पाचेको यांनी केली आहे.