शासनाने ६० व्या मुक्तीदिन सोहळ्यासाठीचा पैसा जनतेसाठी वापरावा ! – गोवा फॉरवर्ड
पणजी, १ डिसेंबर (वार्ता.) – गोवा शासनाकडून गोव्याचा ६० वा मुक्तीदिन सोहळा वर्षभर साजरा करण्याविषयी आम्ही सहमत नाही, असे विधान गोवा फॉरवर्ड पक्षाने केले आहे.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष किरण कांदोळकर म्हणाले, ‘‘गोव्याच्या ६० व्या मुक्तीदिनाच्या सोहळ्याविषयीचे कार्यक्रम ठरवण्यासाठी शासनाने आयोजित केलेल्या बैठकीसाठी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित रहाणार नाहीत. गोव्याची आर्थिक स्थिती बिकट असतांना अमूल्य असा सार्वजनिक पैसा वाया जाणार आहे. सध्या शासकीय कर्मचार्यांना वेतन देण्यासाठी डॉ. प्रमोद सावंत यांचे शासन पैसे उधार घेत आहे. त्यामुळे हा सोहळा साजरा करणे रहित करावे, या आमच्या मागणीशी आम्ही ठाम आहोत. हा पैसा रिक्शाचालक, मोटरसायकलचे पायलट, टॅक्सीचालक, बसमालक ज्यांना या कोविडमध्ये पुष्कळ हानी झाली आहे, त्यांना साहाय्य करण्यासाठी वापरावा. गोव्याच्या विरोधात अनेक प्रकल्प पुढे नेणार्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शासनाने सोहळा साजरा करण्यासारखे काही केलेले नाही.’’