१०० कोटी रुपयांतून गरजूंना साहाय्य करून गोव्याचा ६० वा मुक्तीदिन साजरा करावा ! – दिगंबर कामत, काँग्रेस

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत

पणजी, १ डिसेंबर (वार्ता.) – गोव्याला मिळणार्‍या १०० कोटी रुपयांतून गरजूंना साहाय्य करून गोव्याचा ६० वा मुक्तीदिन साजरा करावा, असे काँग्रेसने म्हटले आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात,

१. ‘‘ गोव्याचा ६० वा मुक्तीदिन १०० कोटी रुपये गरजूंना साहाय्य करून साजरा करावा. यामध्ये स्थानिक कलाकार, गट आणि संस्था यांना सहभागी करावे.

२. आर्थिक स्थिती बिकट असतांना आणि कोविड महामारीचे संकट असतांना पुष्कळ मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्याऐवजी शासनाने गोव्याच्या उत्कर्षासाठी दूरदृष्टीने नियोजन करावे.

३. शासनाने मुक्तीदिन सोहळा साजरा करण्याविषयी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीसाठी बैठकीच्या आधी केवळ १ दिवस आम्हाला कळवण्याविषयी माझा आक्षेप आहे. मला १ डिसेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता आयोजित केलेल्या बैठकीची नोटीस ३० नोव्हेंबर या दिवशी मिळाली.

४. स्वतः मुख्यमंत्र्यांनीच गोव्याची आर्थिक स्थिती बिकट आहे, असे यापूर्वी सांगितले आहे. महसुलामध्ये येणारी तूट भरून काढण्यासाठी सध्या गोवा शासन उधारीवर पैसे घेत आहे.

५. गृहआधार योजना, दिनदयाळ योजना या योजनांचे लाभार्थी ज्येष्ठ नागरिक, अपंग, खलाशी यांना गेल्या ६ मासांत निवृत्तीवेतन मिळालेले नाही. लाडली लक्ष्मीचे लाभार्थीही शासनाने साहाय्य करावे म्हणून प्रतीक्षेत आहेत.

६. कोविड महामारीमुळे आणि देशभरात दळणवळण बंदीचे योग्य नियोजन न केल्याने सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भार वाढला आहे.

७. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे गोव्याच्या आर्थिक साहाय्यासाठी १०० कोटींचे पॅकेज घोषित करावे, अशी विनंती केली होती; परंतु शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या साहाय्यासाठी काहीही पुढाकार घेतलेला नाही. गरजूंना साहाय्य केले, तर खर्‍या अर्थाने ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना दिल्यासारखे होईल.

८. त्यामुळे या परीक्षेच्या काळात सर्वसाधारण माणसांना मूलभूत सुविधा देण्यावर लक्ष केंद्रित करावे. मी शासनाला पाठवलेल्या अहवालाची कार्यवाही केल्यास सध्याच्या बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्यास शासनाला साहाय्य होईल आणि गोव्याच्या ६० व्या मुक्तीदिनानिमित्त गोवा आदर्श राज्य बनण्याच्या दृष्टीने एक पाऊल पडेल.’’