महानगरपालिकेने ‘बीफ’विक्रीला अनुमती दिल्यास आंदोलन छेडू ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी
गोवंश हत्या आणि गोरक्षक यांवर आक्रमणाच्या घटना सातत्याने घडणार्या पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे मुसलमान महिलेकडून ‘बीफ’ विक्रीच्या अनुमतीसाठी महानगरपालिकेकडे अर्ज
|
वसई, १ डिसेंबर (वार्ता.) – वसई-विरार येथे मागील अनेक वर्षांपासून गोमाता आणि गोवंश यांच्या हत्येचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अनेक वेळा कसायांकडून गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे करण्यात आली आहेत. काही मासांपूर्वीच वसई येथे गोरक्ष राजेश पाल यांच्यावर कसायांनी जीवघेणे आक्रमण केले. ही घटना ताजी असतांनाच नालासोपारा (पूर्व) येथे ‘बीफ’ (मोठ्या जनावरांचे मांस) विक्रीसाठी अनुमती मिळावी, यासाठी राबिया अहमद रझा खान या महिलेने वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे अर्ज केला आहे. राज्यात गोवंश हत्या बंदी असतांना महानगरपालिकेने ‘बीफ’ विक्रीसाठी अनुमती दिल्यास ‘मोठे आंदोलन छेडू’, अशी भूमिका विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घेतली आहे.
२६ नोव्हेंबरच्या दैनिक ‘नवशक्ती’मध्ये याविषयी राबिया खान यांचे जाहीर निवेदन प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये ‘मांस विक्रीचा परवाना देण्यास कुणाची हरकत असल्यास त्यांनी हे निवेदन प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे लेखी स्वरूपात कळवावे; अन्यथा महानगरपालिकेकडून मांस विक्रीसाठी अनुमती देण्यात येईल’, असे नमूद करण्यात आले आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, सत्यमेव जयते ट्रस्ट (इंडिया), बहुजन विकास आघाडी, तसेच श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य पिठाच्या धर्मसभा-विद्वत्संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी मांसविक्रीच्या दुकानाला अनुमती देऊ नये, यासाठी महानगरपालिकेला पत्र पाठवले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध !वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या भागात मांस विक्रीसाठी अनुमती देण्याची सिद्धता दर्शवणार्या प्रशासनाचा नालासोपारा शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. |
अन्यथा सामान्य नागरिकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल ! – बहुजन विकास आघाडीची पत्रातून चेतावणी
नालासोपारा येथे अशा प्रकारे मांस विक्रीच्या दुकानाला अनुमती देण्यात येऊ नये; अन्यथा सामान्य नागरिकांच्या उद्रेकाला आपणास सामोरे जावे लागेल. त्याला पूर्णपणे तुम्हीच उत्तरदायी असाल. अपेक्षा आहे की, या पत्राला आपण गांभीर्याने घेऊन लवकर योग्य ती कार्यवाही कराल.
‘बीफ’च्या नावाखाली गोमांसाची विक्री झाल्यास महानगरपालिका दायित्व घेणार का ? – वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य, राष्ट्रीय अध्यक्ष, धर्मसभा-विद्वत्संघ, श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य
वसई ही भगवान परशुरामनिर्मित भूमी आहे. गाय ही हिंदूंसाठी देवता आहे. सर्व देशी पंथांना, तसेच धर्मनिरपेक्ष संविधानाला गायीविषयी नितांत आदर आहे. ‘बीफ’ विक्रीमध्ये गोहत्या आणि गोमांस यांची विक्री होणार नाही, असे कितीही कुणी आश्वासन दिले, तरी अनुमती देणारे किती सक्षमपणे याकडे लक्ष ठेवतील ?, याविषयी आम्ही पूर्ण साशंक आहोत. अनेक राज्यांत गोहत्या बंदीचा कायदा आहे. त्यावर किती कार्यवाही होते, हे जगजाहीर आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे गोमांस आणि म्हैस यांचे मांस पडताळण्याची यंत्रणा नाही, याची आम्हाला माहिती आहे. त्यामुळे या अनुमतीने कुणाच्या धार्मिक भावना दुखावून कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न उभा राहिल्यास त्याचे दायित्व महानगरपालिका स्वीकारणार का ?