मोपा विमानतळाजवळील अतिरिक्त भूमी शासनाने कह्यात घेण्यास तुळसकरवाडी ग्रामस्थांचा विरोध
पणजी, १ डिसेंबर (वार्ता.) – मोपा विमानतळाकडे जाणार्या राष्ट्रीय महामार्गासाठी शासनाने कह्यात घेतलेली भूमी परत करावी, अशी मागणी करत तुळसकरवाडी गावातील लोक मोठ्या संख्येने १ डिसेंबरला रस्त्यावर आले. या ग्रामस्थांना राष्ट्रीय किसान मोर्चा, मोपा विमानतळ संघर्ष समिती, पेडणे तालुका नागरिक समिती, पेडणे कुळ मुंडकार समिती, शिवसेनेचा महिला विभाग आणि पेडणे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते प्रवीण आर्लेकर यांचा पाठिंबा आहे. या वेळी निदर्शनकर्ते म्हणाले, ‘‘लोकांना विश्वासात न घेता ही भूमी शासनाने कह्यात घेतली आहे. ही भूमी वनखात्याकडे असून तेथे फळे लागणारी झाडे आहेत. याविषयी पंचायतीला कळवण्यात काही अर्थ नाही; कारण ते लोकही यामध्ये आहेत. जर ही भूमी परत दिली नाही, तर आम्ही आंदोलन करून रस्ता बंद करू.’’