सिंधुदुर्गनगरी येथे ९ डिसेंबरला डाक अदालतीचे आयोजन
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – टपाल खात्याच्या कार्यपद्धतीविषयी किंवा कामकाजाविषयी ज्या तक्रारींचे निवारण ६ आठवड्यांच्या आत झालेले नसेल, तसेच समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची नोंद घेण्यासाठी ९ डिसेंबर २०२० या दिवशी सकाळी ११ वाजता अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी येथे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक डाकघर, के.एन्. बावनकुळे यांनी दिली आहे.
विशेषत: टपाल, स्पीडपोस्ट काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डर यांविषयीच्या तक्रारी या डाक अदालतीमध्ये विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. संबंधितांनी त्यांची तक्रार के.एन्. बावनकुळे, अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी, टपालपेटी क्रमांक – ४१६८१२ यांच्या नावे ५ डिसेंबर २०२० पर्यंत अथवा त्यापूर्वी पोचेल, अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची नोंद घेतली जाणार नाही, असे बावनकुळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.