जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात राजू शेट्टी आणि पोलीस यांची बाचाबाची !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न !
कोल्हापूर, १ डिसेंबर (वार्ता.) – देहलीच्या बाहेर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले. या वेळी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. पोलीस हा पुतळा कह्यात घेतांना स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. या वेळी पोलिसांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची कॉलर धरून त्यांना आंदोलनाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि राजू शेट्टी यांची बाचाबाची झाली. यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आणि तेही पोलिसांच्या अंगावर धावून गेले.
परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य राखीव दलाची तुकडी मागवण्यात आली. यानंतर शेट्टी यांनी ‘पोलिसांनी त्यांचे काम केले; आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शेतकर्यांच्या मागण्या मान्य करायला लावू’, असे आवाहन केल्यावर कार्यकर्ते शांत झाले.