चेन्नई येथील साधक श्री. के. बालाजी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१. श्री बगलामुखीदेवीचे स्तोत्र ऐकायला आरंभ केल्यावर प्रथम जळका वास येणे, काही वेळाने त्याचे परिवर्तन सुगंधात होणे आणि आनंदावस्था अनुभवणे
‘२३.११.२०१९ या दिवशी मी सकाळपासूनच व्यावसायिक भेटींच्या संदर्भातील विविध कामांमध्ये व्यस्त होतो. संध्याकाळी कामावरून चारचाकीने घरी परततांना मी श्री बगलामुखीदेवीचे स्तोत्र लावले होते. ते ऐकतांना मला जळका वास येऊ लागला. मी तात्काळ चारचाकी थांबवली आणि ‘तो वास कुठून येत आहे ?’, याचा शोध घेऊ लागलो. काही क्षणांतच तो जळका वास नाहीसा झाला आणि होमाच्या वेळी येतो, तसा सुगंध येऊ लागला. हा सुगंध मी घरी जाईपर्यंत येत होता. ‘हा सुगंध श्री बगलामुखीदेवीचे स्तोत्र लावल्यामुळेच येत होता’, हे माझ्या लक्षात आले. या सुगंधामुळे माझे मन पुष्कळ शांत झाले. त्या वेळी मी आनंदावस्था अनुभवत होतो. माझ्यासाठी हा एक आल्हाददायी अनुभव होता.
२. संगणकीय प्रणालीद्वारे ‘विष्णुस्तुती भावसमारंभ’ पहातांना वाईट शक्ती घराबाहेर पडतांना दिसणे
११.१२.२०१९ या दिवशी मी आमच्या घरात संगणकीय प्रणालीद्वारे ‘विष्णुस्तुती भावसमारंभ’ पहात होतो. अकस्मात् मला वाईट शक्तीचा आवाज ऐकू आला. ती शक्ती बाहेर जाण्यासाठी धडपडत होती. थोड्याच वेळात मला ती आमच्या घरापासून दूर जातांना दिसली. ‘हा माझ्या कुटुंबाला मिळालेला ईश्वराचा कृपाशीर्वादच होता’, असे मला वाटते.
३. चेन्नईमधील पार्थसारथी मंदिरात गेल्यावर चांगली स्पंदने ग्रहण होत असल्याचे ३० वर्षांत प्रथमच अनुभवणे
२५.१२.२०१९ या दिवशी मी त्रिपलिकेेन येथील पार्थसारथी मंदिरात गेलो होतो. चेन्नईमधील हे मंदिर ‘दिव्य देसम्’पैकी एक आहे. (टीप : श्रीविष्णूच्या १०८ मंदिरांपैकी प्रत्येक मंदिराला ‘दिव्य देसम्’ असे संबोधले जाते. यांपैकी १०५ मंदिरे भारतात आणि १ नेपाळमध्ये आहे. उर्वरित २ मंदिरे भूलोकाच्या कक्षेबाहेर असल्याचे मानले जाते.) गुरुदेवांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मी पंचकाचम् पद्धतीने धोतर नेसलो होतोे. मंदिरात प्रवेश करताक्षणीच चांगली स्पंदने ग्रहण होत असल्याचे मी अनुभवले आणि देवळात असतांना माझी पुष्कळ भावजागृती झाली. मी गेल्या ३० वर्षांत अनेक वेळा या मंदिरात गेलो आहे; परंतु हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता.’
– श्री. के. बालाजी, चेन्नई (२७.१२.२०१९)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |