साधकांची शारीरिक, तसेच आध्यात्मिक काळजी घेणार्‍या अन्नपूर्णाकक्षातील संत पू. रेखा काणकोणकर !

पू. रेखा काणकोणकर

१. पू. रेखा काणकोणकर यांची आठवण होताच अचानक त्यांचे काही कामानिमित्त येणे होऊन त्यांचे दर्शन होणे आणि ‘मातेला ज्याप्रमाणे लेकराची हाक कुठूनही ऐकू येते’, त्याप्रमाणे घडल्याचे जाणवून मन आनंदी होणे

‘मी रामनाथी आश्रमातून नागेशी येथे स्वयंपाक बनवण्यासाठी गेले होते. तिथे स्वयंपाक बनवतांना ‘एखादा पदार्थ कसा बनवायचा ? त्यात तिखट-मीठ किती घालायचे ?’, हे मी देवाला विचारत असे. तेव्हा साक्षात् अन्नपूर्णा असलेल्या पू. रेखाताई (पू. रेखा काणकोणकर) सूक्ष्मातून ते मला सांगायच्या. अनेकदा ‘नागेशी येथील स्वयंपाकघरातील श्री अन्नपूर्णादेवीची मूर्ती सतत माझ्याकडे पहात आहे’, असे मला वाटायचे आणि तेव्हा मला देवीचे रूप असलेल्या पू. रेखाताईंनाही तेथे अनुभवता यायचे. ‘भाजी ढवळतांना त्यांनी माझा हात धरला आहे’, असे मला वाटायचे. काही दिवसांनंतर मला पू. ताईंना भेटण्याची पुष्कळ इच्छा झाली आणि मी एका साधकाकडे ती व्यक्तही केली. त्या वेळी माझ्याकडनू मनातून त्यांना प्रार्थना झाली, ‘पू. ताई, तुमचे सूक्ष्म रूप मला नेहमी अनुभवता येऊ दे. ‘तुम्ही सतत माझ्यासमवेत आहात’, याची मला जाणीव राहू दे.’ दुसर्‍याच दिवशी पू. रेखाताई एका सेवेनिमित्त नागेशीला आल्या. तेव्हा जशी मातेला लेकराची हाक कुठूनही ऐकू येते, तशी माझी हाक त्यांना ऐकू आल्याप्रमाणे मला वाटले; कारण त्यांचे नागेशीला येणे सहज शक्य नव्हते. त्यांना पाहिल्यावर माझी प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचल्यासारखे वाटून माझे मन आनंदी झाले आणि मला त्यांना शब्दातून काही सांगताच आले नाही.

कु. प्रतीक्षा लोहार

२. पू. रेखा काणकोणकर यांच्या रूपात विठ्ठलाचे दर्शन होणे

मला अभंग आणि भजने म्हणायची आवड आहे. एके दिवशी मी विठ्ठलाच्या आरतीची पहिली ओळ म्हणत होते. मी ‘येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।’, असे म्हणत असतांना अचानक समोर स्थुलातून पू. रेखाताई कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या दिसल्या आणि मला त्यांच्यात विठ्ठलाचे दर्शन झाले. तेव्हा ‘तळमळीने भगवंताला मारलेली हाक भगवंतापर्यंत पोचतेच’, याची मला जाणीव झाली.

३. पू. रेखा काणकोणकर यांनी तत्त्वनिष्ठ राहून चुका सांगणे आणि त्यांवर उपाययोजनाही सांगून साधनेचे प्रयत्न करायला प्रेरणा देणे

एक दिवस मी सहसाधिकेशी अपेक्षेने बोलले आणि ‘तिने तिची चूक स्वीकारावी’, असा अपेक्षेचा तीव्र विचार माझ्या मनात आला. त्यामुळे माझा संघर्ष होत होता. तेव्हा पू. ताईंनी मला बोलावून घेतले आणि म्हणाल्या, ‘‘समोरच्यांची चूक त्यांना साहाय्य म्हणून सांगायची; पण त्या वेळी आपल्या बोलण्याच्या पद्धतीकडेही लक्ष द्यायला हवे.’’ असे सांगून त्यांनी माझी चूक माझ्या लक्षात आणून दिली. अशा प्रकारे त्या मला लगेच अंतर्मुख करतात. त्यामुळे माझी साधना होऊन सेवा करतांना नामजप अखंड चालू रहातो.

४. साधकांची काळजी घेणार्‍या पू. रेखा काणकोणकर !

पू. रेखाताई महाप्रसाद बनवतांना ‘आरोग्यासाठी कोणता आहार चांगला आहे ?’, हे वैद्यांना विचारून घेतात आणि तसा महाप्रसाद बनवून साधकांची काळजी घेतात. काही साधक रुग्णाईत (आजारी) असतात. तेव्हा त्या त्यांना जे काही आवश्यक असेल, ते देतात. कितीही घाईची किंवा तातडीची सेवा असली, तरी पू. रेखाताई त्या साधकांना वेगळा महाप्रसाद करून देण्यास विसरत नाहीत. एखाद्या साधकाने अचानक काही करून मागितल्यावरसुद्धा त्या ते लगेच बनवायला सांगून त्याला देतात.

५. पू. रेखाताई साधकांच्या जवळ येऊन स्वतः वैखरीतून नामजप करून त्यांच्यासाठी चैतन्य पुरवत असल्याचे जाणवणे

काही तातडीच्या सेवांमुळे आम्हाला नामजप करायला वेळ मिळाला नाही, तर पू. रेखाताई आम्ही करत असलेल्या सेवेच्या ठिकाणी येऊन स्वतः वैखरीतून नामजप करून आम्हालाही करायला सांगतात. त्या वेळी त्या आम्हाला चैतन्य पुरवत असल्याचे जाणवते आणि सेवेत उत्साह येतो.’

– कु. प्रतीक्षा लोहार (वय १७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.६.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक