पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीने मतदान ; नोटा पर्याय उपलब्ध नाही
कोल्हापूर, १ डिसेंबर (वार्ता.) – पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत प्रथमच इतक्या चुरशीने मतदान पहावयास मिळाले. कोरोनाची पार्श्वभूमी असतांनाही अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळी ८ पासून रांगा पहावयास मिळाल्या. गेल्या मासात होत असलेल्या आरोप-प्रत्यारोप यांमुळे निवडणुकीत रंगत आली असून महाविकास आघाडी आणि भाजप दोघांनीही विजयाचे दावे केले आहेत. प्रत्येक वर्षी २० ते २५ टक्केच मतदान होत असे. यंदा ही आकडेवारी किमान ५० टक्क्यांपेक्षा अधिक आकडा ओलांडेल याची शक्यता होती. पदवीधरकरिता पुणे विभागात १ सहस्र २०२, तर शिक्षकांसाठी ३६७ मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीत नोटाचा पर्याय उपलब्ध नव्हता, तर पसंती क्रमांकानुसारच मतदान करावे लागत होते. पुणे विभागात कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी मतदान झाले.
१. मतदान प्रक्रियेसाठी काम करणार्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर देण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान केंद्रात भ्रमणभाष नेण्यास बंदी घालण्यात आली होती. मतदान केंद्रात मतदाराला सोडण्यापूर्वी त्याचे तापमान, ऑक्सिजन लेव्हलची पडताळणी करूनच पुढील प्रक्रिया करण्यात येत होती.
२. सांगली जिल्ह्यात दोन्ही निवडणुकींसाठी १९१ मतदान केंद्रे होती. यापूर्वी एका मतदान केंद्रावर किमान १ सहस्र मतदारांची नावे असायची; मात्र कोरोनामुळे यंदा सुमारे ७०० मतदारांसाठी एक केंद्र केले आहे.
३. मतदान करून आल्यावर अनेकांनी सामाजिक संकेतस्थळावर बोटाला लावण्यात आलेल्या शाईसह स्वत:चे सेल्फी छायाचित्र पोस्ट करून इतरांना मतदानाचे आवाहन केल्याचे सकारात्मक चित्र पहावयास मिळाले.
४. सध्या सर्व निवडणुकांसाठी मतदान यंत्राचा वापर केला जातो. इथे मतपत्रिकांवर पसंतीक्रमांकानुसार मतदान करणे बंधनकारक असल्याने मुद्रित मतपत्रिका वापरण्यात आली होती. पदवीधरकरिता ६२, तर शिक्षकसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत. मोठ्या संख्येने उमेवार असल्याने मतपत्रिकेचा आकार मोठा होता आणि मतपत्रिकांची घडी सुटू नये याकरिता प्रत्येक मतदाराला रबरबँड देण्यात येत होता.
५. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी दुपारी ४ पर्यंत ४९.५२ टक्के, तर शिक्षक मतदारसंघासाठी ६७.३६ टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघात दुपारी ४ पर्यंत विक्रमी म्हणजे ८२.१६ टक्के इतके मतदान झाले होते.
६. सांगली जिल्ह्यात भिलवडी गावात मतदान केंद्रावर अचानक गर्दी झाल्याने गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण होते.
७. या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण स्मारक समिती, राजपूत समाज संघटना, परशुराम सेवा संघ, कोकण विकास मंच, फॅमिली डॉक्टर असोसिएशन यांच्यासह ५७ संघटनांनी भाजपला पाठिंबा घोषित केला आहे.