राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या
पुणे – नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्याजवळ (तालुका पारनेर) ३० नोव्हेंबरला रात्री ८ वाजता यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रीय कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. आक्रमण झाल्यानंतर जरे यांना तात्काळ नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
जरे या पुण्याहून नगरकडे येत होत्या. गाडीत मुलगा, आई आणि नगर मधील त्यांची एक मैत्रीण असे चौघेजण होते. गाडीला कट मारल्याच्या कारणावरून त्यांच्यावर धारदार शस्त्राने आक्रमण करण्यात आले. (क्षुल्लक कारणावरून राज्यात हत्या होत आहेत, यावरून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, हेच लक्षात येते. – संपादक) त्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. तसेच आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेविषयी माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली.