गोव्यात पेडणे येथे ३ ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये ३५ लाख रुपयांचे अमली पदार्थ कह्यात
पणजी, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यातील अमली पदार्थविरोधी पथकाने २९ नोव्हेंबरला पेडणे परिसरात वेगवेगळ्या ३ ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये एकूण ३५ लाख रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले. अरंबोल, पेडणे या ठिकाणी टाकलेल्या धाडीमध्ये अमली पदार्थ बाळगल्याविषयी ३ व्यक्तींना अटक केली. यांपैकी दांडो अरंबोल येथील धाडीमध्ये हल्दवानी उत्तराखंड येथील छत्रसिंह या व्यक्तीकडून १० लाख ५० सहस्र रुपये किमतीचा २.१ किलो चरस कह्यात घेतला. गीरकर वाडा, अरंबोल येथील धाडीमध्ये बडमेर राजस्थान येथील चंदन सिंह याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे ११ लाख ९५ सहस्र किमतीचा २.३९० किलो चरस सापडला. केपकरवाडा अरंबोल येथे टाकलेल्या तिसर्या धाडीत बरूआ, कुलु मनाली येथील राजू लामा या व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडे १२ लाख ५० सहस्र रुपये किमतीचा २.५ किलो चरस सापडला.