विजेची प्रलंबित देयके भरण्याविषयी वीज खात्याकडून एकरकमी (ओटीएस्) योजना

पणजी, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यातील वीज खात्याकडून ज्या ग्राहकांची देयके भरणे प्रलंबित आहेत, अशांसाठी ‘ऑनलाईन’ एकरकमी (ओ.टी.एस.- वन टाईम सेेटलमेंट) योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेखाली ग्राहकांना त्यांची प्रलंबित देयके पूर्णतः किंवा अंशतः भरता येतील. या योजनेखाली देयके विलंबाने भरण्याविषयीच्या शुल्कामध्ये सूट देण्यात येईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी २९ नोव्हेंबरला ही योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या ग्राहकांना वीज खात्याच्या https:/www.goaelectricity.gov.in या संकेतस्थळाचा उपयोग करून वीजदेयके भरता येतील. वीज ग्राहकांसाठी ही योजना १ डिसेंबर २०२० ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत चालू राहील. ज्या ग्राहकांची देयके प्रलंबित आहेत, त्यांनी देयकाची मूळ रक्कम भरल्यानंतर किती हप्त्यांमध्ये वीजदेयके भरणार, त्या कालावधीनुसार विलंबाने भरणा केल्याविषयीच्या शुल्कात सूट दिली जाईल.