राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे मानसिक आरोग्य पडताळण्यासाठी आरोग्य कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याचा शासनाचा आदेश
मनोबळ वाढण्यासाठी मानसिक स्तरावरील समुपदेशनासमवेत आध्यात्मिक बळ प्राप्त करून घेणेही आवश्यक आहे. आध्यात्मिक बळामुळे मन कोणत्याही संकटांचा प्रतिकार करू शकते. आध्यात्मिक बळ साधनेनेच मिळते. यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन शासनाने आरोग्य कर्मचार्यांना धर्मशिक्षण देण्याची सोय प्राधान्याने करावी, ही अपेक्षा.
मुंबई – राज्यातील प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाची मानसिक पडताळणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यासाठी आधुनिक वैद्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही पडताळणी कशा प्रकारे करावी, याविषयीचा अहवाल या समितीने नुकताच शासनाकडे सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचा आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. यामध्ये मनोरुग्णांसाठी स्वतंत्र उपचारपद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे.
पुढील सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
१. या पडताळणीमध्ये कोरोनाबाधित व्यक्तीला मानसिक समस्या आढळल्यास त्यांना तातडीने मानसोपचारतज्ञांकडे पाठवण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक, बालक आणि गरोदर माता यांना मानसिक ताण निर्माण होऊ नये, यासाठी आरोग्याविषयी जनजागृती करण्यावर भर द्यावा.
२. रुग्णालयांमध्ये मानसोपचारतज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञ यांचे आठवड्यातून एकदा समुपदेशन करावे.
३. आत्महत्येचा प्रयत्न केलेले किंवा तसा विचार येत असलेल्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर मानसोपचारतज्ञांच्या पहाणीखाली उपचार करण्यात यावेत. त्यांच्यासाठी आवश्यक त्या अन्य उपाययोजना केल्या जाव्यात.
४. सतत सेवारत असलेले आधुनिक वैद्य, परिचारिका यांच्यासह अन्य आरोग्य कर्मचारी यांचा तणाव दूर होण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात.
५. रुग्णालयांमध्ये मानसोपचारतज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञ उपलब्ध नसल्यास खासगी सेवा देणार्या तज्ञांची नियुक्ती करावी.