बालपणापासून नामस्मरणाचा संस्कार झाल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले गुरु म्हणून लाभल्याचे लक्षात येणे
१. आईने घरात प्रत्येकाला नामजप करण्यास सांगणे आणि जप न केल्यास न जेवण्याची शिक्षा देणे
‘मी आठ वर्षांची किंवा थोडीशी लहान असेन. त्या वेळी आईने आम्हा भावंडांना जपमाळ आणून दिली आणि प्रत्येकाला नामजप करायला सांगितले. आमचे कुलदैवत श्री गणपति असल्याने आईने आम्हाला रात्री जेवणापूर्वी ‘श्री गणेशाय नमः।’ हा जप एक माळ करायला सांगितला होता. त्यामुळे एक माळ जप करूनच आम्ही जेवायला बसायचो. माझे वडील, बहीण आणि भाऊ प्रत्येकी १ माळ जप करायचे. माझी आई तर पुष्कळ नामजप करायची. ती ३ घंटे बसून जप करायची. मला माळ घेऊन नामजप करण्याचा कंटाळा यायचा. एकदा ‘‘मी जप करणार नाही’’, असे आईला सांगितल्यावर तिने मला ‘जेवायचे नाही आणि उभे रहायचे’, अशी शिक्षा दिली. मी रडत नामस्मरण करत उभी राहिले; पण मी माळ घेऊन जप करत नव्हते. असे करतांना माझा नामजपही होत होता. अखेरीस रात्री ८ वाजता वडील म्हणाले, ‘‘जा, तू जेव. मी तुझ्यासाठी जपमाळेने नामजप करतो’’ अन् त्यांनी बसून माझ्यासाठी माळ घेऊन नामजप केला. मी जेवून परत रडत झोपी गेले.
२. ‘अभ्यास न केल्यास शाळेतील शिक्षिका ओरडतील’, या भीतीने शाळेत न जाणे आणि त्या कालावधीत वाटेत दगडाची देवपूजा करत खेळत रहाणे
मला अभ्यासाची फारशी आवड नव्हती. मला पाठांतर करायला आवडत नव्हते. माझा गणित विषय चांगला होता. मला आधुनिक वैद्य (डॉक्टर) होण्याची पुष्कळ इच्छा होती. शाळेमध्ये गेल्यावर ‘अभ्यास किंवा गृहपाठ केला नाही किंवा काही चूक झाली, तर शिक्षिका ओरडतील’, या भीतीने मी शाळेत जायचे नाही. शाळेत जातांना मार्गात एक खड्डा होता. मी त्या खड्ड्यात लपून बसायचे. तिथे बसून मी एक लहानसा खड्डा करून त्यात एक दगड ठेवायचे. त्या दगडाला मी देव मानायचे आणि त्याला फूल वाहून ‘देव देव’ म्हणून खेळायचे. मी समवेत नेलेला डबा तिकडेच बसून खायचे आणि बहिणीची शाळा सुटल्यावर तिच्या समवेत घरी यायचे. असे आठ दिवस झाल्यावर मुख्याध्यापिका घरी आल्या आणि त्यांनी मी शाळेत येत नसल्याचे सांगितले. नंतर आईने मला पुष्कळ मारले. तिने मला रागाने विचारले, ‘‘खरे सांग, तू शाळेच्या वेळी कुठे जातेस ? काय करतेस ?’’ मग मी आईला सर्व सांगितले. तेव्हा आई मला पुष्कळ ओरडली आणि म्हणाली, ‘‘बघ विचार कर. तुला कुणी काय केले असते, तर तू काय करणार होतीस ?’’ मग आईने मला त्या शाळेतून काढले आणि बहिणीच्या शाळेत घातले.
३. आईने रामकृष्ण परमहंस यांची गोष्ट सांगून नामस्मरणाचे महत्त्व मनावर ठसवणे
बहिणीच्या शाळेत जाऊ लागल्यावर मी घालत असलेल्या लाल स्वेटरवरून मुले गाणे म्हणून मला चिडवायची. त्यामुळे मला अतिशय राग यायचा. त्यामुळे ‘‘मी शाळेत जाणार नाही. मला जायचे नाही. मला मुले चिडवतात’’, असे सांगून मी रडायचे. तेव्हा माझा भाऊ म्हणायचा, ‘‘अग ती मुले लांब राहून तुला चिडवतात ना ? तुला ती काही करत नाहीत. मग त्यांना ओरडू दे. तुझे काय जाते ? तू शाळेत जा.’’ तेव्हा आई मला म्हणाली, ‘‘स्मिता, मी तुला रामकृष्ण परमहंस यांचा एक परिच्छेद वाचून दाखवते.’’ आईने एका पुस्तकातील २ परिच्छेद मला वाचून दाखवले. त्यांचा सारांश असा होता, ‘रामकृष्ण जेव्हा नामस्मरण करत जंगलातून जात होते. त्या वेळी त्यांच्यासमवेत त्यांचा देव सतत असायचा.’ त्यानंतर आई मला म्हणाली, ‘‘तूही नामस्मरण करत रहा, म्हणजे या सर्व गोष्टी पालटतील.’’
४. नामस्मरणामुळे शाळेत चिडवणार्या मुलांचा त्रास न्यून झाल्याचे लक्षात येणे आणि तेव्हापासून सतत नामजप करण्याची सवय लागणे
एक दिवस मी विचार केला, ‘आई सांगते, तर आपण नामजप करून पाहूया.’ मी नामस्मरण करत शाळेत जाऊ लागले आणि खरंच त्या दिवशी मला चिडवणारी मुले तिथे नव्हती. दुसर्या दिवशीही मी नामस्मरण करत गेले; परंतु त्या मुलांपैकी कुणी मला काही बोललेच नाही. तेव्हा मला आईचे म्हणणे पटले. तेव्हापासून माझे नामस्मरण चालू झाले, तेे आतापर्यंत सतत चालू आहे.
५. जेव्हा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाच्या ध्वनीचकती ऐकत असते, तेव्हा ‘इतके महान गुरु मला केवळ नामस्मरणामुळेच मिळाले’, हे परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच माझ्या लक्षात आले.’
– श्रीमती शुभा राव (प.पू. भक्तराज महाराज यांनी ठेवलेले नाव) (श्रीमती स्मिता राव), पणजी (११.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |