साधकांनो, श्रीविष्णूला अपेक्षित अशी साधना करून अंतरंगातील वैकुंठलोकाची अनुभूती घ्या !
‘विष्णुभक्ती करण्यासाठी आपल्या सर्वांना मिळालेली अमूल्य संधी म्हणजे ‘वैकुंठचतुर्दशी !’ वैकुंठचतुर्दशी या दिवसाचे महत्त्व असे आहे की, या दिवशी सर्व भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार खुले असते. जो भक्त या दिवशी थोडीशीही विष्णुभक्ती करतो, त्याच्यासाठी वैकुंठधामात स्थान मिळणे सुनिश्चित आहे. ‘वैकुंठचतुर्दशीच्या निमित्ताने श्रीविष्णूच्या दिव्य वैकुंठधामाची प्राप्ती करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, हे शिकवण्यासाठी या लेखाच्या माध्यमातून साक्षात् श्रीविष्णु वैकुंठलोकाचे महाद्वार उघडून आपल्याला साधनेची पुढची दिशा देणार आहे. भगवंताच्या या भावलीलेबद्दल आपण त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करूया.
(भाग ३)
लेखाचा भाग २ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/426738.html
३० नोव्हेंबर या दिवशी आपण वैकुंठलोकातून पृथ्वीलोकात आलेल्या जिवांसाठी श्रीविष्णूने निर्माण केलेला मुक्तीचा मार्ग हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया !
६. साधकांना वैकुंठधामाची प्राप्ती करून देणारी वैकुंठलोकाची सप्तद्वारे
६ अ. ‘साधकांना वैकुंठधामी पोचण्यासाठी सप्तद्वारांतून जावे लागणार आहे आणि परात्पर गुरुरूपात अवतार धारण करून मीच प्रत्येक द्वारातून साधकांना पुढे घेऊन जाणार आहे’, असे श्रीविष्णूने सांगणे : ‘या वैकुंठलोकाची अनुभूती घेण्यासाठी ‘आपल्याला साक्षात् श्रीविष्णु काय सांगत आहे ? कोणता मार्ग दाखवत आहे ?’, हे समजून घेऊया. श्रीविष्णु सांगत आहे, ‘मला परम प्रिय असलेल्या सनातनच्या सर्व साधकांना वैकुंठधामी पोचण्यासाठी सप्तद्वारांतून जावे लागणार आहे. परात्पर गुरुरूपात अवतार धारण करून मीच साधकांसाठी ही सप्तद्वारे खुली केली आहेत. ही सप्तद्वारे साधकांना परमानंदाकडे घेऊन जाणारी आहेत. या सप्तद्वारांतील प्रत्येक द्वारावर मीच उभा असेन. साधकांना तेथून पुढे पुढे मीच घेऊन जाणार आहे. केवळ माझे स्मरण करून साधकांनी प्रत्येक द्वारातून पुढे जायचे आहे. ही सप्तद्वारे पार केल्यानंतर साधकांना परमानंदाची अनुभूती येणार आहे.’
जगत्पालक श्रीविष्णूची केवढी ही कृपा आहे ! कृपानिधान अशा विष्णूने आपल्या सर्वांसाठी सप्तद्वारे खुले केली आहेत; पण ‘जी आपल्याला थेट वैकुंठधामात प्रवेश देणार आहेत, ती सप्तद्वारे कोणती आहेत ?’, हे समजून घेऊया.
६ आ. वैकुंठलोकाच्या महाद्वाराचे वर्णन : अत्यंत विशाल, सुंदर आणि दिव्य असे हे वैकुंठाचे महाद्वार आहे. सुवर्णासमान तेजस्वी अन् दैदीप्यमान अशा महाद्वाराला विविध रत्ने जडवलेली आहेत. हे महाद्वार पहाणार्याच्या मनात विचार येईल, ‘केवळ हे द्वार बाहेरून पाहूनच आपल्याला इतके प्रसन्न आणि चांगले वाटते, तर प्रत्यक्ष वैकुंठ कसे बरे असेल ?’
६ इ. वैकुंठलोकाची सप्तद्वारे
६ इ १. वैकुंठलोकाचे पहिले महाद्वार – गुरुकृपा
६ इ १ अ. परात्पर गुरुदेवांचा प्रत्येक साधकाच्या जीवनात प्रवेश झाला. त्या क्षणी ‘गुरुकृपा’ हे पहिले महाद्वार उघडणे : वैकुंठाचे पहिले द्वार म्हणजे महाद्वार आहे, ज्याच्याविना आपण कदापि पुढे जाऊ शकत नाही. ते महाद्वार कोणते असेल ? ‘आपण सर्वसामान्य जीव आहोत. आपल्याला वैकुंठलोक कुठे आहे ? तेथे कसे जायचे ?’, याविषयी काहीच ठाऊक नाही’, हे श्रीविष्णूला ज्ञात असल्याने तो आपल्या जीवनात परात्पर गुरुदेवांच्या रूपात अवतरित झाला. ज्या क्षणी परात्पर गुरुदेवांचा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात प्रवेश झाला, त्या क्षणी श्रीविष्णुलोकाच्या सप्तद्वारांपैकी पहिले महाद्वार उघडले, ते म्हणजे गुरुकृपा ! केवळ आणि केवळ गुरुकृपेनेच वैकुंठलोकाचे पहिले महाद्वार आपल्यासाठी उघडले आहे.
६ इ १ आ. साक्षात् मोक्षगुरु लाभल्याने साधक भाग्यवान असणे आणि गुरुकृपेमुळेच साधक प्रत्येक खडतर परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडत असणे : अनेक भक्तांना ईश्वराच्या प्राप्तीसाठी अनेक वर्षे अथवा अनेक जन्म घ्यावे लागतात; पण आपण साधक परम भाग्यवान आहोत की, आपल्याला साक्षात् मोक्षगुरुच लाभले आहेत. आज आपण साधनेच्या ज्या कोणत्या टप्प्याला आहोत, ते केवळ आणि केवळ गुरुकृपेनेच आहोत. गुरुकृपा म्हणजे गुरूंच्या छत्रछायेखाली सुरक्षित असणे. जर गुरूंची कृपा असेल, तर नराचा नारायण होऊ शकतो. एवढे गुरुकृपेमध्ये सामर्थ्य आहे. आपण सारे भाग्यशाली जीव असल्याने आपल्यावर प्रत्येक क्षणी, प्रत्येक स्तरावर, मग ती वैयक्तिक अडचण असो, साधनेतील अडचण असो, घरची अडचण असो, गुरुकृपेमुळेच आपण प्रत्येक परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडत आहोत. ‘आपल्यावर अखंड गुरुकृपा होत आहे’, याची अनुभूती आपण सर्व जण घेतच आहोत.
६ इ १ इ. गुरुकृपेने अनेक जन्मांची साधना एका जन्मातच होत असणे : आपल्यावर गुरुकृपा असल्यानेच कित्येक जन्मांची साधना केवळ या एका जन्मात गुरुदेव करवून घेत आहेत. कित्येक जन्मांच्या अनंत अपराधांतून या एका जन्मात ते मुक्त करत आहेत. अनंत जन्मांच्या दोष-अहंच्या संस्कारांपासून ते आपल्याला सोडवत आहेत. अतिशय तीव्र प्रारब्ध या एका जन्मात भोगण्याची शक्ती ते आपल्याला देत आहेत. गुरुसेवेच्या आणि साधनेच्या तेजाने ते आपले कठीण प्रारब्ध नष्ट करत आहेत. या सर्वांतही आपण केवळ अंशमात्रच त्रास झेलत आहोत. बाकी सर्व भार साक्षात् गुरुदेवच उचलत आहेत.
६ इ १ ई. परात्पर गुरुदेवांच्या परम चरणी सर्वकाही सोपूवन निश्चिंतपणे साधनेचे प्रयत्न करून अखंड गुरुकृपा अनुभवूया ! : आईच्या कुशीत जसे बाळ अत्यंत निश्चिंत असते, अगदी तसेच आपणही सारे परात्पर गुरुदेवांच्या परम चरणी सर्वकाही सोपवून निश्चिंतपणे साधनेचे प्रयत्न करून अखंड गुरुकृपा अनुभवूया. गुरुकृपा सातत्याने अनुभवली, तर वैकुंठाचे पहिले द्वार आपल्यासाठी सतत खुले असणार आहे. खरोखरच वैकुंठाचे पहिले महाद्वार, म्हणजेच गुरुकृपा !
६ इ २. वैकुंठलोकाचे दुसरे महाद्वार – तळमळ
६ इ २ अ. अध्यात्मात महाविष्णूची प्राप्ती करायची असेल, तर अधिक तळमळीने प्रयत्न करणे आवश्यक ! : गुरुकृपेमुळे साधनेला आरंभ झाला की, आपोआपच साधनेची गोडी लागते आणि ‘साधनेद्वारे मिळणारा आनंद सतत मिळावा’, याचा ध्यास लागतो. खरोखर ही ‘तळमळ’ हेच विष्णुलोकाचे दुसरे द्वार आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, साधनेत तळमळीला ८० टक्के महत्त्व आहे. व्यवहारात जर आपल्याला काही मिळवायचे असेल, तर आपण त्याचा ध्यास घेतो आणि ते साध्य होईपर्यंत पुष्कळ कष्ट घेतो अन् ती गोष्ट साध्य करतोच. मग अध्यात्मात तर आपल्याला साक्षात् ब्रह्मांडनिर्मात्या महाविष्णूची प्राप्ती करायची असेल, त्याच्यासाठी आपण किती तळमळले पाहिजे ?
६ इ २ आ. परात्पर गुरुदेवांची ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची उच्च कोटीची तळमळ आपल्यात निर्माण व्हायला हवी ! : परात्पर गुरुदेवांनी हिंदु राष्ट्र-स्थापनेचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्नरत आहेत. हिंदु राष्ट्र आणण्यासाठी आणि आपल्या सर्वांना हिंदु राष्ट्रासाठी घडवण्यासाठी ते अपार कष्ट घेत आहेत. ही गुरुदेवांची उच्च कोटीची तळमळ आहे. तशी तळमळ आपल्यामध्ये त्यांच्या प्राप्तीसाठी आणि त्यांना अपेक्षित असे हिंदु राष्ट्र घडण्यासाठी निर्माण व्हायला हवी.
६ इ २ इ. तळमळीने गुरुसेवा करून वैकुंठाच्या दुसर्या महाद्वाराची अनुभूती घेऊया ! : स्वत:ला पालटण्यासाठीची, दोष-अहंच्या जंजाळातून मुक्त होण्याची, तसेच श्रीविष्णूला भेटण्याची तळमळ आपल्या अंतरामध्ये निर्माण करूया. तळमळ कठोराहून कठोर मार्गही सोपा करते. जसा पाण्याविना मासा तळमळतो, तशी तळमळ ईश्वराच्या चरणांच्या प्राप्तीसाठी आपल्यामध्ये निर्माण व्हायला हवी. ‘तळमळच आपला ईश्वरप्राप्तीचा मार्ग मोकळा करणार आहे’, याची अनुभूती आपण सर्वांनी घेऊया. वैकुंठाच्या दुसर्या महाद्वाराची अनुभूती घेऊया. प्रत्येक कृती आणि विचार तळमळीने करूया. गुरुसेवेचा आणि ईश्वरप्राप्तीचा ध्यास घेऊया.
६ इ ३. वैकुंठ लोकाचे तिसरे महाद्वार – शरणागती
६ इ ३ अ. ‘आपण पुष्कळ न्यून पडत आहोत’, याची जाणीव झाल्यावर शरणागतभाव निर्माण होणे : तळमळीद्वारे विष्णुलोकाचे दुसरे द्वार उघडले, तरीही पुढे आणखी द्वार आहे आणि ते बंद आहे, म्हणजे ईश्वरापर्यंत पोचण्यासाठी केवळ अंतरातील तळमळही पुरेशी नाही. ‘अजूनही आपण पुष्कळ न्यून पडत आहोत’, याची मनाला जाणीव झाल्यावर श्रीविष्णूच्या कृपेने आपल्या अंतरामध्ये ईश्वराप्रती शरणागतीचा भाव निर्माण होतो.
६ इ ३ आ. श्रीमन्नारायणाला शरणागतीने घातलेली आर्त साद ! : ‘हे श्रीमन्नारायणा, तळमळीमुळे जेव्हा दुसरे द्वार उघडले, तेव्हा आम्हाला वाटले होते की, आता पुढील मार्ग सोपा आहे; परंतु पुढचे द्वार बंद असलेले पाहून आमच्या लक्षात आले, ‘तुला शरण आल्याविना पर्याय नाही.’ हे श्रीमन्नारायणा, आम्ही तुला देह, मन आणि बुद्धी यांसहित संपूर्ण शरण आलो आहोत.’
६ इ ३ इ. प्रत्येक प्रसंग आणि परिस्थिती यांमध्ये भगवंतापुढे शरणागती पत्करूया आणि शरणागतीचे सामर्थ्य अनुभवूया ! : आपण जेव्हा अशी आर्त साद श्रीमन्नारायणाला घालू, त्याच क्षणी वैकुंठलोकाचे तिसरे भव्य द्वार उघडून तो आपली शरणागती त्याच्या चरणी अर्पण करून घेणार आहे. अशा प्रकारे सातत्याने आपण श्रीविष्णूला शरण गेलो, स्वतःची असमर्थता व्यक्त केली, तर निश्चितच वैकुंठलोकात प्रवेश करण्यासाठी तिसरे द्वार आपल्यासाठी सदैव खुले असणार आहे. यापुढे आपण सर्व जण प्रत्येक प्रसंग आणि परिस्थिती यांमध्ये भगवंतापुढे शरणागती पत्करूया आणि शरणागतीचे सामर्थ्य अनुभवूया.’
(क्रमशः)
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, कु. वैष्णवी वेसणेकर आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(संदर्भ : २६.११.२०२० या दिवशी भाववृद्धी सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतलेला ‘वैकुंठ चतुर्दशी’ हा विषय)
लेखाचा भाग ४ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/427380.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |