सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप करतांना श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे यांना आलेल्या अनुभूती
‘२३.३.२०२० या दिवशी मी ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा जप ३ वेळा आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ १ वेळा अन् पुन्हा ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा ३ वेळा आणि ‘ॐ नमः शिवाय ।’ १ वेळा असा नामजप सांगितल्याप्रमाणे करत होतो.
१. पहिल्या सत्रात ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप ३ वेळा करतांना मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ नामजप १ वेळा करतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होत होते.
२. नंतरच्या सत्रात ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ नामजप ३ वेळा करत असतांना मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे आणि ‘ॐ नमः शिवाय ।’ नामजप १ वेळा करतांना परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होत होते.
३. ईश्वर मला म्हणाला, ‘श्री दुर्गादेवी या दोघींच्या माध्यमातून कार्य करत आहे. ब्रह्मांडाचा समतोल राखण्यासाठी हा नामजप आहे.’
४. उजव्या बाजूला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आहेत, म्हणजे पहिले सत्र श्री दुर्गादेवीच्या नामजपाचे आहे. मध्यभागी श्री गुरुदेव दत्त, म्हणजे गुरुमाऊली डॉक्टर परब्रह्म परमात्मा आहेत. पुन्हा त्यांच्या डाव्या बाजूला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आहेत; म्हणून दुर्गादेवीचा नामजप आणि या काळात सर्व संकटांवर जय मिळवण्यासाठी लयाची देवता मृत्यूंजय मंत्र ‘ॐ नमः शिवाय ।’ साक्षात् शिवदशेत असलेली परात्पर गुरुमाऊली आहेत.
असा हा अद्भुत नामजपच कोरोना विषाणूच्या विरोधात प्रतिकारशक्ती वाढवणार आहे. आपत्काळात तीन गुरुच आपल्याला तारणार आहेत.’
परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, आपल्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार !’
– श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे, ढवळी, फोंडा, गोवा. (२६.१०.२०२०)
श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे यांना शेषनागाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१. ध्यान करत असतांना ‘शेषनागाने वेटोळे घातले आहे’, असे जाणवणे आणि दुपारी घराच्या पाठीमागे नागाचे दर्शन होणे
‘२६.३.२०२० या दिवशी मी नामजप करतांना माझे ध्यान लागले. तेव्हा सकाळचे १० वाजले होते. ‘माझ्याभोवती शेषनागाने वेटोळे घातले आहे’, असे मला जाणवले. मी शेषनागाला विचारले, ‘तुला कुणी पाठवले ?’ तेव्हा तो म्हणाला, ‘मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तुझ्या रक्षणासाठी पाठवले आहे.’ मी ‘बरं’ म्हणालो. नंतर मला दुपारी आमच्या घराच्या पाठीमागे प्रत्यक्ष नागाचे दर्शन झाले. मी याविषयी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगितल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘हो दादा, मलाही पहाटे नागाचे दर्शन झाले.’’
२. नागदेवता आणि शेषशायी श्रीविष्णूचे श्री लक्ष्मीसहित दर्शन होणे
२ अ. ‘नागदेवता डोक्यावर फणा धरून रक्षणासाठी उभी आहे’, असे जाणवणे, शेषशायी श्रीविष्णूचे श्री लक्ष्मीसहित दर्शन होऊन भावजागृती होऊन कंठ दाटून येणे : मला पुष्कळ वेळा जाणवते, ‘नागदेवता माझ्या डोक्यावर फणा धरून रक्षणासाठी उभी आहे.’ मला कधी कधी शेषशायी श्रीविष्णूचे दर्शन श्री लक्ष्मीसहित होते. तेव्हा मी श्री लक्ष्मीमातेला ‘माते, तुझे हात चेपून देऊ का ? युगानुयुगे तू सेवेत आहेस. तू अव्याहतपणे सेवा करतेस’, असे विचारतो. त्या वेळी माझी भावजागृती होऊन माझा कंठ दाटून येतो.
२ आ. मला तेथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होते आणि श्री लक्ष्मीस्वरूपात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन होते. तेव्हा माझा कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव जागृत होतो.’
– श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे, ढवळी, फोंडा, गोवा. (२६.१०.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |