ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या
मुंबई – ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी (वय ३९ वर्षे) यांनी चंद्रपूर येथील आनंदवन येथे विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने तेथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र आधुनिक वैद्यांनी त्यांना मृत घोषित केले. मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अनुमान व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे.
जेष्ठ समाजसेविका व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी #डॉ_शीतल_आमटे– करजगी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!🙏💐 @AmteSheetal यांनी जनसेवेतून दिलेले योगदान मोलाचे आहे. 🙏 #SheetalAmte #RIP #श्रद्धांजली pic.twitter.com/FfcZPaL5Df
— मराठी विचारधन (@marathivichar) November 30, 2020
डॉ. शीतल आमटे-करजगी या बाबा आमटे यांचे पूत्र डॉ. विकास आमटे यांच्या कन्या होत्या. आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्या म्हणून त्या काम पहात होत्या. त्यांचे पती गौतम करजगी हेही विश्वस्त मंडळाचे सदस्य आहेत. त्यांना ६ वर्षांचा मुलगा आहे. मागील काही मासांपासून डॉ. शीतल आणि आमटे कुटुंबीय यांच्यामध्ये आनंदवनाच्या कारभारावरून वाद चालू होता. काही दिवसांपूर्वी डॉ. शीतल आमटे यांनी ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या कामाविषयी विश्वस्तांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी ‘फेसबूक’वरील ‘पोस्ट’ ‘डिलीट’ केली होती.
#श्रद्धांजली डॉ.शीतल आमटे करजगी यांच्या निधनानंतर तरी त्यांच्या कामांना, त्यांच्या विचारांना त्यांच्या मृत्यूनंतर तरी न्याय मिळाला पाहिजे… ना.डॉ.नीलम गोऱ्हे
*त्यांच्या मृत्यू मुळे झालेली हानी ही काही भरून येणासारखी नाही,कुष्ठरोगी व पिडीतांनी खरी साथीदार गमावली आहे.@MahaDGIPR pic.twitter.com/rPJ0UBmKaQ— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) November 30, 2020
या ‘पोस्ट’वरून आमटे कुटुंबियांतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले. डॉ. शीतल यांनी केलेले आरोप आमटे कुटुंबियांनी फेटाळून लावले, तसेच डॉ. शीतल यांचे वडील विकास आमटे आणि आई भारती आमटे यांच्यासह अन्य आमटे कुटुंबियांनी डॉ. शीतल या मानसिक तणावात असल्याचे एक निवेदन प्रसिद्ध केले होते. आत्महत्येच्या ८ घंट्यांपूर्वी सकाळी ५.४५ वाजता डॉ. शीतल यांनी ‘युद्ध आणि शांतता’ नावाचे स्वत: काढलेले चित्र ‘ट्विटर’वर ‘पोस्ट’ केले आहे.
पोलिसांकडून निवासस्थानाची पडताळणी
चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्यासह अन्य पोलीस अधिकार्यांकडून आनंदवन येथील डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या निवासस्थानाची पडताळणी करण्यात येत आहे. डॉ. शीतल यांचा मृतदेहाची उत्तरीय पडताळणी करण्यासाठी त्यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातून चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नेण्यात आला आहे.