अमेरिकेतील निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आता ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनीही केला आरोप
रियो डी जनेरो (ब्राझिल) – नोव्हेंबर मासाच्या आरंभी झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोटाळा झाला असल्याचा आरोप ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांनी केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, माझ्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अनियमितता होती. त्यामुळे मी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना सध्यातरी स्वीकारलेले नाही.
वर्ष २०२२ मध्ये ब्राझिलमध्ये होणार्या निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरण्यावरूनही बोल्सोनारो यांनी आपला विरोध दर्शवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच बोल्सोनारो हे बहुसंख्यांकवादी म्हणजेच उजव्या विचारसरणीचे नेते असल्याचे म्हटले जाते.
Brazilian President Jair Bolsonaro has alleged that there was “a lot of fraud” in the #USElections2020 https://t.co/qCWzlEpy1z
— WION (@WIONews) November 30, 2020
काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनीही अमेरिकेतील निवडणुकीच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवले होते. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचेही म्हटले होते.
या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांना ३०२ ठिकाणी विजय मिळाला, तर मावळते राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना २३४ ठिकाणीच विजय मिळू शकला. विजयी उमेदवाराला किमान २७० मते मिळणे आवश्यक होते. पुढील वर्षी २० जानेवारीला बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.