कुडाळ तहसीलदारांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार्या चौघा वाळूमाफियांवर गुन्हा नोंद
वाळूमाफियांवर कठोर कारवाई न झाल्यास जिल्ह्यात जंगलराज यायला वेळ नको !
कुडाळ – अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर असतांना २८ नोव्हेंबरला मध्यरात्री २ वाजता तालुक्यातील आंदुर्ले खिंड येथे वाळूमाफियांनी कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक आणि त्यांचे सहकारी कर्मचारी यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तहसीलदार पाठक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चौघांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कुडाळ आणि वेंगुर्ले तालुक्यात खाडी, तसेच नद्या यांच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूचे उत्खनन होते. कुडाळमधून मोठ्या प्रमाणात डंपरने वाळू गोव्याच्या दिशेने नेली जाते. ही वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार पाठक यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल तालुक्यातील सरकारी वाहनाने २८ नोव्हेंबरला गस्त घालत होते. तहसीलदारांचे वाहन कुडाळ येथून आंदुर्ले गावच्या दिशेने जाताना एका चारचाकी वाहनाने तहसीलदारांच्या वाहनाचा पाठलाग केला. आंदुर्ले खिंड येथे तहसीलदारांचे वाहन अडवून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या चारचाकीतून आलेल्या चित्तरंजन पी. सावंत यांच्यासह ४ व्यक्ती हातात दांडे आणि काचेच्या फुटलेल्या बाटल्या घेऊन उतरल्या आणि आक्रमण करण्याच्या उद्देशाने पथकावर धावून आले. ‘वाळू वाहतूक रोखण्यासाठी बाहेर पडलात, तर तंगड्या तोडू’, अशी धमकी देऊन त्या व्यक्तींनी शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. तेथून कुडाळ येथे माघारी परतत असतांना त्या चारचाकी वाहनातील व्यक्तींनी कुडाळ पोलीस ठाण्यापर्यंत पाठलाग केला. वाहन कुडाळ पोलीस ठाणे आवारात गेल्यानंतर ती चारचाकी पुढे निघून गेली, अशी तक्रार पाठक यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे.