तिरूवण्णामलाई (तमिळनाडू) येथे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात आला कार्तिक दीपोत्सव !
तिरूवण्णामलाई (तमिळनाडू) – येथे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच २९ नोव्हेंबर २०२० या दिवशी अरुणाचलेश्वर पर्वतावर सायंकाळी ६ वाजता कार्तिक दीप लावण्यात आला. प्रतिवर्षी कार्तिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी तिरुवण्णामलाई येथील अरुणाचलेश्वर मंदिरात आणि तेथील अरुणाचल पर्वतावर सुंदर असा एक मोठा दीप प्रज्वलित केला जातो अन् त्यानंतर कार्तिक दीपोत्सव साजरा केला जातो.
जो मोठा दीप लावला जातो, त्यास जवळजवळ साडेतीन सहस्र किलोहून अधिक तूप आणि १ सहस्र मीटर कापड वातीसाठी वापरले जाते. त्याआधी पहाटे ४ वाजता अरुणाचलेश्वर मंदिरात कार्तिक दीप प्रज्वलित केला जातो आणि नंतर तोच दीप पुजारी अन् गावकरी एकत्रितपणे पर्वतावर घेऊन जातात. सायंकाळी ठीक ६ वाजता ‘कार्तिक दीपम्’ लावला जातो. या दीपोत्सवाचे थेट प्रसारण दूरचित्रवाहिन्यांद्वारे केले जाते. ते प्रसारण जगभरातील १४ कोटी तमिळ भाषा बोलणारे हिंदू ‘कार्तिक दीपम्’चा उत्सव पहातात आणि प्रत्येक जण ‘कार्तिक दीपम्’ लावून एक प्रकारे या उत्सवात सहभागी होतात.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सनातनच्या ३ गुरूंसाठी केले दीप प्रज्वलित !
या उत्सवाच्या निमित्ताने सनातनच्या गुरुपरंपरेतील परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ३ गुरूंसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तिरूवण्णामलाई येथील अरुणाचल पर्वतावर सायंकाळी ३ दीप प्रज्वलित केले.
प्रत्यक्ष शिवाचे स्थान असलेल्या अरुणाचल पर्वतावर दीप प्रज्वलित केल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प्रार्थना केली की, हे शिवशंकरा, आम्हाला दैदीप्यमान हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी बळ दे आणि या दिव्याप्रमाणे तेज प्रदान कर.