कार्तिक मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व
_‘१६.११.२०२० या दिवसापासून कार्तिक मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, दक्षिणायन, शरदऋतू, कार्तिक मास चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. वैकुंठचतुर्दशी : कार्तिक शुक्ल चतुर्दशी तिथीला वैकुंठचतुर्दशीनिमित्त शिव आणि श्रीविष्णुदेवता यांचे पूजन करण्यास सांगितले आहे. या दिवशी आवळी पूजन आणि भोजन करावे. निशीथकाळात (मध्यरात्री) असलेल्या चतुर्दशीला श्रीविष्णुपूजन करून नंतर अरुणोदयकाळी शिवपूजन करावे.
२ आ. त्रिपुरारि पौर्णिमा : या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केल्याने या पौर्णिमेला ‘त्रिपुरारि पौर्णिमा’ असे म्हणतात. ही तिथी प्रदोषव्यापिनी पाहिजे. या दिवशी सायंकाळी त्रिपुरवाती लावून दीपोत्सव साजरा केला जातो.
२ इ. कार्तिकस्वामी दर्शन : कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र असा एकत्र योग असतांना श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घेण्यास सांगितले आहे. २९.११.२०२० या दिवशी दुपारी १२.४८ पासून ३०.११.२०२० या दिवशी सकाळी ६.०३ वाजेपर्यंत कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र असा एकत्र योग असल्याने या वेळेत श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घ्यावे.
२ ई. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. २९.११.२०२० या दिवशी दुपारी १२.४८ पासून उत्तररात्री १.५६ पर्यंत विष्टी करण आहे, तसेच ३.१२.२०२० या दिवशी सकाळी ६.५८ पासून सायंकाळी ७.२७ पर्यंत विष्टी करण आहे.
२ उ. कार्तिकस्नान समाप्ती : सूर्योदयकाली असलेल्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिकस्नान समाप्ती होते.
२ ऊ. गुरुनानक जयंती : कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गुरुनानक जयंती साजरी केली जाते. शीख धर्माची स्थापना गुरुनानक यांनी केली. हा दिवस शीख धर्मियांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
२ ए. तुळशीविवाह समाप्ती : कार्तिक शुक्ल एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी भगवान विष्णूचा तुळशीशी विवाह साजरा करून मंगलकार्ये चालू होतात.
२ ऐ. मन्वादी : कल्पादी, युगादी आणि मन्वादी या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे. धर्म सावर्णिनुसार कार्तिक पौर्णिमेला मन्वादी योग आहे.
२ ओ. दग्ध योग : दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. २.१२.२०२० या दिवशी बुधवार असून सायंकाळी ६.२२ पासून तृतीया तिथीला आरंभ होत असल्याने तेव्हापासून ३.१२.२०२० या दिवशी सकाळी ६.५८ सूर्योदयापर्यंत दग्ध योग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयापासून वाराला आरंभ होतो.
२ औ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. ४.१२.२०२० या दिवशी दुपारी १.३९ पासून रात्री ८.०४ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयानंतर वार पालटतो.
टीप २ – संकष्ट चतुर्थी, घबाड मुहूर्त, भद्रा (विष्टी करण) आणि दग्ध योग यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे. टीप : वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. १. हरिचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥ – संत एकनाथ अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. २. तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ॥ – संत तुकाराम अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’ |
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.(२१.११.२०२०)