साधकांनो, श्रीविष्णूला अपेक्षित अशी साधना करून अंतरंगातील वैकुंठलोकाची अनुभूती घ्या !
काल वैकुंठचतुर्दशी झाली त्यानिमित्ताने…
‘विष्णुभक्ती करण्यासाठी आपल्या सर्वांना मिळालेली अमूल्य संधी म्हणजे ‘वैकुंठचतुर्दशी !’ वैकुंठचतुर्दशी या दिवसाचे महत्त्व असे आहे की, या दिवशी सर्व भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार खुले असते. जो भक्त या दिवशी थोडीशीही विष्णुभक्ती करतो, त्याच्यासाठी वैकुंठधामात स्थान मिळणे सुनिश्चित आहे. ‘वैकुंठचतुर्दशीच्या निमित्ताने श्रीविष्णूच्या दिव्य वैकुंठधामाची प्राप्ती करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, हे शिकवण्यासाठी या लेखाच्या माध्यमातून साक्षात् श्रीविष्णु वैकुंठलोकाचे महाद्वार उघडून आपल्याला साधनेची पुढची दिशा देणार आहे. भगवंताच्या या भावलीलेबद्दल आपण त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करूया.
२९ नोव्हेंबर या दिवशी आपण वैकुंठचतुर्दशीचे पौराणिक महत्त्व आणि श्रीविष्णूचे, म्हणजेच विष्णुस्वरूप गुरुदेवांचे सेवक हीच साधकांची खरी ओळख हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया !
(भाग २)
लेखाचा भाग १ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/426738.html
४. वैकुंठलोकातून पृथ्वीलोकात आलेल्या जिवांसाठी श्रीविष्णूने निर्माण केलेला मुक्तीचा मार्ग !
४ अ. श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून स्वतः भगवंतानेच त्याच्या प्राप्तीचे, म्हणजे ईश्वरप्राप्तीचे महत्त्व सांगितलेले असणे : ‘श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, ‘हे अर्जुना, ब्रह्मलोकासहित सर्व लोक पुनरावर्ती आहेत (सूत्र ४ इ पहा); परंतु हे कुंतीपुत्रा, माझी प्राप्ती झाल्यावर पुनर्जन्म होत नाही; कारण मी कालातीत आहे.’ गीतेच्या माध्यमातून स्वतः भगवंतानेच त्याच्या प्राप्तीचे, म्हणजे ईश्वरप्राप्तीचे महत्त्व आपल्याला सांगितले आहे.
४ आ. आपल्या सर्वांचे मूळ घर ‘वैकुंठलोक’ असणे : मनुष्यजन्माचे मूळ ध्येय ईश्वरप्राप्ती हे आहे. ईश्वराने याच उद्देशाने आपल्याला जन्माला घातले आहे. आपण केवळ या जन्मात पृथ्वीलोकात रहात आहोत; पण आपल्या सर्वांचे मूळ घर कोणते आहे ? ईश्वराचे घर म्हणजेच ‘वैकुंठलोक’, हेच आपले मूळ स्थान आहे. वैकुंठातील श्रीविष्णूचे कोमल चरण हेच आपले आश्रयस्थान आहे.
४ इ. ब्रह्मदेवाचेही निर्मितीस्थान असणारा वैकुंठलोक ! : महाप्रलयाच्या वेळी सृष्टी इत्यादी काहीच नसते. तेव्हा श्रीविष्णूच बालरूपात पिंपळाच्या पानावर शयन करतात. पुढे श्रीविष्णूच्या नाभीतून कमलपुष्प उत्पन्न होते. या कमलपुष्पातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते आणि ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतो. सृष्टीची निर्मिती करणार्या ब्रह्मदेवाचेही जे निर्मितीस्थान आहे, असे श्री विष्णूूचे परम धाम वैकुंठलोक, त्याचे चरणकमल, हाच आपल्या सर्वांचा अंतिम आसरा आहे.
४ ई. सर्व भक्तांचे मूळ धाम असलेल्या वैकुंठलोकात भगवंत त्याच्या भक्तांची आतुरतेने वाट पहात असणे : भगवंत त्याच्या भक्ताच्या हृदयमंदिरातच वास करत असतो. भगवंताचे धाम हेच त्याच्या भक्ताचे धाम असते. ‘आपण सर्व जण त्याचे भक्त कधी एकदा त्याला भेटायला जाणार ? कधी त्याच्या आणि आपल्यातील वैकुंठलोक अन् पृथ्वीलोक हे स्थुलातील अंतर संपणार ?’, याची भगवान श्रीविष्णु पुष्कळ आतुरतेने वाट पहात आहे. अशा भगवंताच्या भेटीसाठी आपण सर्व त्याचे भक्तही आतुर होऊया. आपल्या भक्तीच्या आधारे लवकरात लवकर आपण वैकुंठलोकात श्री विष्णुदर्शनासाठी जाऊया. भक्तीने भगवंताच्या भेटीचे द्वार उघडूया.
४ उ. वैकुंठातील श्रीविष्णूने परात्पर गुरुदेवांच्या माध्यमातून भूतलावर अवतार धारण करणे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना केल्याने साधक अन् भगवंत यांच्यातील अंतर हळूहळू न्यून होत असणे : आपल्या भेटीसाठी आपल्यापेक्षा भगवंतच अधिक आतुर आहे. त्यामुळे आपण आणि भगवंत यांच्यामधील अंतर न्यून होण्यासाठी, आपल्या सर्व भक्तांना भेटण्यासाठी अत्यंत व्याकुळ होऊनच वैकुंठातील श्रीविष्णूने परात्पर गुरुदेवांच्या माध्यमातून भूतलावर अवतार धारण केलेला आहे. त्यांच्या चैतन्यदायी अस्तित्वामुळे या पृथ्वीलोकातील वातावरण हे सात्त्विक आणि आपल्या साधनेसाठी अत्यंत पूरक बनत आहे. आपल्याला साधना करण्यासाठी साक्षात् श्री विष्णूने परात्पर गुरुदेवांच्या माध्यमातून ‘गुरुकृपायोग’ नावाचा पाचवा वेद निर्माण केला आहे. हा गुरुकृपायोग सर्व योगांचा अपूर्व संगम आहे. या गुरुकृपायोगात त्यांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गानुसार साधना करत असल्यामुळे आपल्या सर्वांचे जीवात्मे पृथ्वीलोकातून उच्च लोकाकडे, म्हणजे मूळ विष्णुलोकाकडे जात आहेत. अशा प्रकारे आपण आणि भगवंत यांच्यातील अंतर हळूहळू न्यून होत आहे.
४ ऊ. ‘गुरुकृपायोगासारख्या अमूल्य योगनिर्मितीच्या काळात साधकांचाही जन्म या पृथ्वीलोकावर होणे आणि ते सनातन संस्थेशी जोडले जाणे’, ही श्रीविष्णुलीलाच असणे आणि या काळात जन्माला येणारे जीव विष्णुलीलेचे साक्षीदार असून ते अत्यंत भाग्यवान असणे : या संपूर्ण विश्वाचा सांभाळ करणार्या श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलीची भक्ती करण्यासाठी कितीही जन्म घेतले, तरी ते अल्पच आहेत. अशा परात्पर गुरूंनी शिकवल्याप्रमाणे जो साधना करत आहे, तो आपल्या त्रासापासून आणि प्रारब्धापासून मुक्त होऊन मोक्षापर्यंत जाणारच आहे. अशी गुरुमाऊली आपल्या उद्धारासाठी आणि आनंदासाठी या पृथ्वीवर आपल्या समवेत प्रत्यक्ष वास करत आहे. या गुरुमाऊलीने शिकवलेली साधना म्हणजे आपल्यासाठी प्राणच आहे. ‘गुरुकृपायोगासारख्या अमूल्य योगनिर्मितीच्या काळात आपलाही जन्म या पृथ्वीलोकावर होणे आणि आपण सनातन संस्थेशी जोडले जाणे’, ही श्रीविष्णुलीलाच आहे. आपण सर्व साधक या विष्णुलीलेचे साक्षीदार आहोत. त्यामुळे या काळात जन्माला येणारे जीव अत्यंत भाग्यवान आहेत. ‘विष्णुकृपेने आपले संपूर्ण जीवनच ‘न भूतो न भविष्यति ’ असे झाले आहे’, याबद्दल आपण सर्वांनी श्रीविष्णुचरणकमली कोटीशः कृतज्ञता व्यक्त करूया.
५. धरतीवरील वैकुंठ – भुवैकुंठ
आज आपण सर्वांनी वैकुंठलोकाचे वर्णन ऐकले. सर्व लोकांपेक्षाही उच्च स्थानी असलेले, असे हे वैकुंठधाम आहे; परंतु त्या वैकुंठधामात कुणाला स्थान मिळते ? जो सर्व स्वभावदोष आणि अहं यांपासून मुक्त होऊन सर्वगुणसंपन्न ईश्वराचे सर्व गुण स्वतःमध्ये आत्मसात करून घेतो, त्याला वैकुंठधामात स्थान मिळते. मग ‘आपल्याला मुक्ती मिळेपर्यंत आपल्याला वैकुंठधामाचे दर्शन होणारच नाही का ?’, असाही प्रश्न कुणाच्या मनात येऊ शकतो. अशा जिवांचीही काळजी भगवंताने घेतली आहे.
५ अ. युगांनुसार स्थापित झालेले वैकुंठधाम : या धरतीवर बद्रीनाथ, जगन्नाथ आणि द्वारकापुरी यांनाही वैकुंठधामच म्हटले आहे. सत्ययुगात बद्रीनाथ धामाची स्थापना साक्षात् स्वतः नारायणाने केली होती. त्रेतायुगात ‘रामेश्वरम्’ची स्थापना स्वयं भगवान श्रीरामाने केली होती. द्वापरयुगात द्वारकाधामाची स्थापना योगेश्वर श्रीकृष्णाने केली आणि आता कलियुगामध्ये जगन्नाथ धामालाच वैकुंठधाम म्हटले आहे.
५ आ. परात्पर गुरुदेव हे विष्णु असल्याने त्यांनी संपूर्ण धरतीचे वैकुंठधामामध्ये परिवर्तन केलेले असणे : केवळ हे धाम एवढेच वैकुंठ नाहीत, तर जेथे विष्णु आहे, तेथे वैकुंठ आहे. परात्पर गुरुदेव म्हणजे स्वयं विष्णु आहेत. ते जेथे आहेत, तो वैकुंठलोकच आहे. ते या धरतीवर आहेत, म्हणजे सूक्ष्मातून या संपूर्ण धरतीचेच त्यांनी वैकुंठधामामध्ये परिवर्तन केलेले आहे.
५ इ. सनातन संस्थेचे सर्व साधक सनातनरूपी वैकुंठधामाचीच अनुभूती घेत असणे आणि ‘अंतरंग वैकुंठाप्रमाणे बनवण्याचे ध्येय महाविष्णूने साधकांना दिलेले असणे : खर्या अर्थाने सनातनचे सर्व साधक सनातनरूपी वैकुंठधामाचीच अनुभूती घेत आहेत. परात्पर गुरुदेव आपल्याला शिकवत आहेत की, आपले अंतरंग हे म्हणजे वैकुंठधामच आहे. हे आपण सर्वांनी आपल्या अंतर्मनात कोरून ठेवूया. ‘आपले अंतरंग आपल्याला वैकुंठाप्रमाणे बनवायचे आहे’, ही जाणीव मनामध्ये ठेवून साधकांनी प्रयत्न केले, तर निश्चितच त्यांना या मर्त्यलोकातही वैकुंठातील परमानंदाची अनुभूती येईल.
वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने महाविष्णूने आपल्याला ध्येय दिले आहे, ‘खर्या अर्थाने वैकुंठाची अनुभूती घ्या.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, कु. वैष्णवी वेसणेकर आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(संदर्भ : २६.११.२०२० या दिवशी भाववृद्धी सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतलेला ‘वैकुंठ चतुर्दशी’ हा विषय)
(क्रमशः उद्याच्या अंकात)
लेखाचा भाग ३ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/427123.html
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |