म्हादई जलतंटा न्यायालयाबाहेर मिटवणे अशक्य ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पणजी, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधील म्हादई जलतंटा न्यायालयाबाहेर मिटवणे अशक्य आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. म्हादई जलतंटा लवादाने म्हादईच्या पाणी वाटपासंबंधी निवाडा यापूर्वी दिला आहे. या निवाड्याला गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांनी ‘स्पेशल लिव्ह पीटीशन’च्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात ‘स्पेशल लिव्ह पीटीशन’ प्रविष्ट केलेले असतांना कर्नाटक राज्याने म्हादईचे पाणी वळवल्याने गोवा राज्याने कर्नाटक राज्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा यांनी नुकतेच गोवा आणि कर्नाटक यांनी म्हादई प्रश्न न्यायालयाच्या बाहेर मिटवण्यासाठी एक शिष्टमंडळ गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पाठवल्याचे वृत्त आहे. या वृत्ताच्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवले आहे आणि यामुळे गोव्यात म्हादईच्या पाण्याची पातळी घटली आहे. म्हादईप्रश्नी राज्यशासनाची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असल्याने राज्यशासन न्यायालयाबाहेर या प्रकरणावर तोडगा काढण्यास कोणत्याही परिस्थितीत सिद्ध नाही. कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवणे बंद करावे. ‘म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवले आहे’, असे ठाम मत गोवा शासनाने नुकतेच गोवा भेटीवर आलेले भाजपचे गोवा प्रभारी सी.टी. रवि यांच्याकडेही मांडले आहे.’’