केवळ धूळफेक !
‘उत्पादनाचे अवास्तव वर्णन करणारी विज्ञापने’ ही आपल्याकडे काही नवीन गोष्ट नाही. १५ दिवसांत तोंडवळा उजळ होण्याची हमी देणारे ‘लव्हली क्रीम’ असो, उंच इमारतीवरून किंवा कड्यावरून उड्या मारण्याची शक्ती मिळत असल्याचे दाखवणारे एखादे शीतपेय असो किंवा एक कापड फिरवल्यावर फरशी चकाचक चमकत असल्याचे दाखवणारे एखादे स्वच्छतेचे रसायन (‘क्लीनझिंग एजंट’) असो ! उत्पादनाचे अवास्तव ‘मार्केटिंग’ करण्याचा हा प्रकार कोरोनोच्या काळात अजून वाढलेला दिसून येत आहे. गेल्या काही मासांपासून जगभरात कोरोनाने हाहाःकार माजवल्याने विषाणूच्या संदर्भात एक प्रकारची भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. त्याच्याच आधारे एखादे उत्पादन ९९.९ टक्के जिवाणू अथवा विषाणू यांचा नायनाट करत असल्याचे दावे आस्थापनांकडून करण्यात येत आहेत. अंगाला लावण्याचे आणि कपडे धुण्याचे साबण, स्वच्छता करण्याचे ‘सोल्युशन’ इथपासून ते अगदी स्वयंपाकघरात वापरायच्या तेलापर्यंत ९९.९ टक्के विषाणूरोधकाचे दावे केले जात आहेत. ‘विषाणूंना मारायची सर्व उत्पादने सिद्ध आहेत, केवळ लसच काय ती यायची शेष आहे’, असाच याचा अर्थ नाही का ! ०.१ टक्का गाळून कायदेशीर कसोटीतून सर्व आस्थापनांनी त्यांची सुटका केली आहे; पण विश्वासार्हता आणि नैतिकता यांच्या कसोट्यांचे काय त्या कसोट्यांवर ही उत्पादने ९९.९ टक्के अपयशी ठरल्याचेच म्हणावे लागेल.
‘मार्केटिंग’च्या (विपणनाच्या) नावाखाली उत्पादनाचे अवास्तव गुणवर्णन करणे, ही ग्राहकांची एक प्रकारे केलेली फसवणूकच आहे. अधिकाधिक आर्थिक लाभ मिळवण्याच्या नादात व्यवसायामध्ये आपण खोटेपणा तर करत नाही ना, याचा उत्पादक आणि ‘मार्केटिंग’ करणारे यांनी विचार करणे आवश्यक आहे. उत्पादनांची गुणवैशिष्ट्ये ठसवण्यात काही चुकीचे नाही; पण कल्पनेच्या भरार्या घेत उत्पादनाचे अतीमहिमामंडन करणे अयोग्य आहे. ‘बाता रुपयाच्या, तथ्य आण्याचे’ (१ आणा = सव्वासहा पैसे) असे व्हायला नको, याची उत्पादकांनी दक्षता घ्यायला हवी. ग्राहकांचा या उत्पादनांवरील ९९.९ टक्के विश्वास उडून गेला, तर त्या व्यवसायाला काय अर्थ राहिला ?
– सौ. गौरी कुलकर्णी, फोंडा, गोवा.