अफगाणींची खदखद
अफगाणिस्तानमध्ये गत १५ वर्षांत २६ सहस्र लहान मुलांना जीव गमवावा लागला. प्रतिदिन सरासरी ५ मुलांना तेथे जीव गमवावा लागत आहे किंवा ते घायाळ होत आहेत. अफगाणिस्तानमध्ये अखंड युद्धजन्य परिस्थिती आहे. तेथे तालिबान आणि स्थानिक सरकार यांच्यात रक्तरंजित संघर्ष अफगाणिस्तानवर सत्ता मिळवण्यासाठी चालू असतो. तालिबानला अफगाणिस्तानचा भूप्रदेश स्वत:च्या कह्यात हवा आहे, तर सरकारला तो त्यांच्या नियंत्रणात ठेवायचा आहे. या अफगाणिस्तानमध्येच कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेनचा तळ होता. तालिबानखेरीज अन्य आतंकवादी संघटना अफगाणिस्तानात कार्यरत आहेत. अमेरिकेवर ९/११ चे आतंकवादी आक्रमण झाल्यानंतर अमेरिकेच्या फौजा तेथे पोचल्या. तेव्हापासून अमेरिका आणि तालिबान यांच्यातही दीर्घकाळापासून संघर्ष चालू आहे.
अमेरिकेलाही तालिबानचा पूर्णपणे बीमोड करणे शक्य झालेले नाही. याचे कारण म्हणजे या संघटनेचा तेथील लोकांवर असलेला पगडा ! तेथील लोकांना आक्रमक तालिबान अजूनही त्यांच्यासाठी ‘मसिहा’ वाटतो. परिणामी तालिबानींना मारले, तरी नवे तरुण भरती होत असल्याने त्यांची शक्ती अल्प होत नाही. संघर्ष करून कंटाळलेल्या अमेरिकेने अफगाणमधून त्यांचा गाशा गुंडाळण्यास प्रारंभ केला आहे. अमेरिका टप्प्याटप्प्याने अफगाण येथील त्यांच्या सैनिकांची संख्या अल्प करत आहे, तर दुसरीकडे तालिबानची शक्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निरपराध नागरिकांच्या हत्यांचे सत्र असेच काही दिवस चालू राहील, यात शंकाच नाही. अमेरिकेने भारतालाही येथे लक्ष घालण्यास सांगितले आहे. भारताकडे सैन्य शक्ती आणि शस्त्रास्त्र संपन्नता आहे. त्यामुळे अमेरिकेला भारताकडून अपेक्षा आहेत. अफगाणिस्तानमध्ये भारताच्या वतीने अनेक प्रकल्प चालू आहेत. तेथील संसदही भारताने बांधून दिली आहे. भारताच्या शेजारी पाक आणि चीन यांसारखे मोठे शत्रू आहेत. अशा वेळी भारताला अफगाणिस्तानमध्ये हातपाय पसरण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अफगाण सरकारला पाकही त्यांचा शत्रू वाटतो. त्यांचाही पाकसमवेत सीमावाद चालू आहे. सरकारने प्रबळ इच्छाशक्ती दाखवून पाकपुरस्कृत आतंकवाद संपवून अफगाणिस्तानात झेप घ्यावी, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !