समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या महाग प्रकल्पाचा फेरविचार करावा – आशिष शेलार
मुंबई – समुद्राचे पाणी गोडे करून त्याचा मुंबईकरांना पुरवठा करण्याच्या प्रकल्पावर १ सहस्र ६०० कोटी रुपये व्यय होणार आहेत. खरंच हा महागडा प्रकल्प मुंबईकरांना परवडणारा आहे का ?, हे लक्षात घेऊन या प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी मागणी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
मुंबईत मे आणि जून मासात लोकांना पाणी कपातीचा सामना करावा लागतो. पाणी कपातीचे हे संकट टाळण्यासाठी मनोर येथील समुद्राचे २०० एम्एल्डी खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. निःक्षारीकरणाच्या प्रकल्प उभारण्याचा आढावा घेऊन पुढील प्रक्रिया चालू करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत; मात्र हा प्रकल्प खर्चिक आहे, असे भाजपाने म्हटले आहे.