वेळेत अग्नीशमनाचा बंब न मिळाल्याने ७ एकरवरील उसाची हानी
वेळेत अग्नीशमनाचा बंब न मिळाल्याने ७ एकरवरील उसाची हानी : संतप्त शेतकर्यांनी जळालेला ऊस नगर परिषदेसमोर आणून टाकला
दायित्वशून्य प्रशासन !
मुरुगुड (जिल्हा कोल्हापूर) – येथील वेदगंगा नदीला लागून असलेल्या दत्त मंदिराजवळील ३० एकरातील ऊसाला आग लागली. यात शेतकर्यांची चाळीस लाख रुपयांची हानी झाली. सूरज मोरबाळे यांच्या ७ एकर ऊसासह ठिबक सिंचनाची लाखो रुपयांची वाहिनी जळाली. ऊस पेटलेला असतांना नगर परिषदेने वेगवेगळी कारणे सांगत अग्नीशमन बंब न पाठवल्याने १० हून अधिक संतप्त शेतकर्यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष याच्या दालनाबाहेर जळालेला ऊस टाकला.
या वेळी नगर परिषदेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह एकही नगरसेवक, नगरसेविका उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. त्यांनी प्रशासनाचा निषेध केला. जोपर्यंत मुख्याधिकारी येत नाही तोपर्यंत ऊस काढू नये, अशी भूमिका शेतकर्यांनी घेतली. या संदर्भात मुख्याधिकारी संजय गायकवाड म्हणाले, ‘‘यापूर्वी पालिकेच्या अग्नीशमन बंबाने तात्काळ सेवा दिल्या आहेत. सध्या १५ दिवसांपासून बंबाचे इंजिन बंद आहे. त्याची बांधणी सोलापूरमध्ये केली होती. याची दुरुस्ती होत नाही. त्यामुळे लवकरच नागरिकांच्या सेवेमध्ये पर्यायी गाडी ठेवणार आहे.’’ (बंब उपलब्ध न झाल्याने शेतकर्यांचा ऊस जळाले याची भरपाई कोण देणार ? उद्या एखादे घर-दुकाने यांना आग लागल्यावर बंब नसल्याने जीवितहानी झाल्यास त्याचे दायित्व कुणाचे ? – संपादक)