तुळशीविवाहाच्या दिवशी विद्यालयांमध्ये ‘घटनादिन’ पाळण्यास सांगितल्याने शिक्षकांमध्ये अप्रसन्नता
पणजी, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – तुळशीविवाहाच्या दिवशी विद्यालयांमध्ये ‘घटनादिन’ पाळण्यास सांगितल्याने शिक्षकांमध्ये अप्रसन्नता दिसली. यंदा बहुतांश हिंदू २६ नोव्हेंबर या दिवशी घरी तुळशीविवाह हा सण साजरा करणार होते. प्रतिवर्षी दीपावलीच्या सुट्टीत तुळशीविवाहाचा दिवस येत असल्याने तुळशीविवाहाच्या दिवशी विद्यालयांना सुट्टी असतेच; मात्र यंदा राज्यशासनाने दीपावलीची सुट्टी घटवली आणि तुळशीविवाहाच्या दिवशी ऐच्छिक सुट्टी घोषित केली. त्यातच शिक्षण खात्याने २६ नोव्हेंबरला विद्यालयांमध्ये ‘घटनादिन’ साजरा करून त्याचा छायाचित्रासह पुरावा पाठवण्याचा आदेश दिला.
शिक्षण खाते २३ नोव्हेंबर या दिवशी काढलेल्या आदेशात म्हणते, ‘‘२६ नोव्हेंबर या दिवशी विद्यालयांमध्ये ‘घटनादिन’ साजरा करावा. विद्यालयात सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत प्रतीज्ञा वाचावी. या वेळी कोरोना महामारीवरून असलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून अधिकाधिक विद्यार्थी आदींचा सहभाग या कार्यक्रमात करून घ्यावा. प्रत्येक शाळेने ३ चांगली छायाचित्रे २७ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२ वाजेंपर्यंत ‘एस्.सी.ई.आर्.टी.’ला पाठवायची आहेत.’’ शिक्षण खात्याने प्रारंभी तुळशीविवाहाच्या दिवशी ऐच्छिक सुट्टी घोषित केली आणि नंतर ‘घटनादिन’ पाळण्यास सांगितल्याने शिक्षकांमध्ये अप्रसन्नता आहे. ‘शिक्षकांना शिक्षण खाते गृहित धरते’, असा शिक्षकांचा आरोप आहे.
(गोव्यातील लोक धार्मिक असून द्वादशीला तुळशीविवाह मोठ्या प्रमाणात साजरे करतात, हे शिक्षण खात्याला ठाऊक नाही का ? अन्य धर्मियांचे सण येतात म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या जातात आणि हिंदूंची श्री गणेशचतुर्थी असतांना एका वर्षी पोटनिवडणूक घेतली गेली, तर आता तुळशीविवाहाच्या दिवशी घटनादिन साजरा करण्यास सांगण्यात आला. भाजपच्या राज्यात हे अपेक्षित नाही ! – संपादक)