प्रकल्पांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होणार्या आमदारांना भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून समज
पणजी, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यात चालू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनात सत्ताधारी पक्षातील आमदारांनी सहभाग घेऊन प्रकल्प बंद पाडणे चुकीचे आहे. सर्वसामान्य नागरिक असे करू शकतो; मात्र सत्ताधारी आमदार असे करू शकत नाही. सत्ताधारी आमदाराच्या मनात प्रकल्पांविषयी काही गोंधळ असल्यास त्यांनी त्याविषयी प्रमथ शासनाला सांगितले पाहिजे. याविषयी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे चर्चा केली पाहिजे. कुणीही कायदा हातात घेऊ नये, अशी चेतावणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी २६ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.
रेल्वेमार्ग दुपदरीकरण, तम्नार वीजवाहिनी प्रकल्प आदी ३ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या विरोधातील आंदोलनात काही सत्ताधारी आमदार सहभागी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तनावडे यांनी ही चेतावणी दिली आहे.
आरोशी येथे रेल्वेमार्ग दुपदीकरणाला स्थानिकांचा विरोध आंदोलकांमध्ये भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांचा सहभाग
कुठ्ठाळी – आरोशी येथे चालू असलेल्या दक्षिण पश्चिम रेल्वेच्या रेल्वेमार्ग दुपदरीकरणाच्या कामाला २६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी स्थानिकांनी विरोध दर्शवला. दुपदरीकरणासाठी साहित्य ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणी ‘गोयांत कोळसा नाका’ या संघटनेचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनीही या वेळी घटनास्थळी उपस्थिती लावून आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला.