‘कोरोना’रूपी भ्रष्टाचार !
जवळपास गेल्या वर्षभरापासून कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. या काळात कोरोनाची एक-दोन नव्हे, तर तिसरी लाट आली आहे. यात आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू, तर कोट्यवधी लोकांना त्याची लागण होऊन ते त्यातून बरे झाले आहेत. तरीही बरे होणार्यांनाही नंतर काही शारीरिक त्रास होत आहेत, म्हणजेच कोरोनाचा प्रभाव नंतरही दिसून येतो. संपूर्ण जगात कोरोनावर लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. रशिया, चीन आणि अमेरिका यांनी त्यांच्या लसी आणल्या आहेत. त्याला ९० ते ९५ टक्के यश मिळत असल्याचा दावा या देशांकडून केला जात आहे; पण भारतात मात्र अद्याप लस बनलेली नाही. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पुढील वर्षी ती लस येण्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. कदाचित् ती येईल आणि ‘पुढील वर्षभरात भारतासह जगातून कोरोनाचा नायनाट होईल’, अशी आशा बाळगायला काहीच अडचण नसावी; मात्र जगात भ्रष्टाचार, लाचखोरी नावाच्या संसर्गजन्य आजारावर शेकडो वर्षांतही लस सापडलेली नसल्याने त्याचा प्रभाव कायम आहे. जगभरातील लोकांनी तिला स्वीकारलेले आहे, असे दिसून येते.
‘या आजाराविना जगता येणार नाही’, अशीच लोकांची मानसिकता झाली आहे. हा आजार कधीच नष्ट होऊ शकत नाही; कारण यामागील असणारा विषाणू अधिक भयंकर आहे. त्यावर लस निघू शकत नाही, अशीच लोकांची धारणा झालेली आहे. कदाचित् ती योग्य असेल; मात्र तरीही त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. तसा प्रयत्न करणे जनता आणि सरकार यांच्या हातात आहे. आर्य चाणक्य यांनी म्हटले आहे, ‘पाण्यातील मासा जसा पाणी कधी पितो, हे कळत नाही, तसेच एखादा अधिकारी पैसे कधी खातो, (लाच किंवा भ्रष्टाचार) हे कळत नाही.’ हे पूर्वीच्या काळात योग्य होते; मात्र आताच्या काळात कोण लाच घेतो आणि कोण भ्रष्टाचार करतो, हे जनतेसह पोलीस आणि सरकार यांनाही ठाऊक असते; मात्र ‘मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ?’, असा प्रश्न येथे उपस्थित होतो. हे सांगण्याचा उद्देश हा की, आशिया खंडात भारतामध्ये ३९ टक्के लाचखोरी केली जाते. ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ संस्थेच्या सर्वेक्षणामध्ये देशातील ४७ टक्के लोकांना असे वाटते, ‘गेल्या वर्षभरात भारतातील भ्रष्टाचार वाढला आहे.’ गेल्या वर्षभरातील ८ मास कोरोनामुळे सर्वच कारभार ठप्प असतांना भ्रष्टाचार कसा वाढला ? हाच प्रश्न जनतेला पडला आहे. याचा आता वेगळा शोध घेण्याची आवश्यकता आहे. तसेच एरव्ही सर्व कारभार चालू असतांना सरकारी कार्यालय, पोलीस, प्रशासन आदींकडून भ्रष्टाचार होतो, हे मान्य करता येते; मात्र यातील बहुतेक कामकाज न्यून प्रमाणात चालू असतांना भ्रष्टाचार झालाच कसा ? असा प्रश्न उपस्थित होतो. याचा अर्थ असा समजायचा की, जसा कोरोनाचा संसर्ग होणे बुद्धीपलीकडे आहे, तसाच भ्रष्टाचार वाढणे बुद्धीपलीकडे आहे.
संघर्षाची सिद्धता आणि त्याग हवा !
भारतासह जगात भ्रष्टाचार किंवा लाचखोरी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आहेत; मात्र तरीही ती होते. याचे प्रमाण कमीअधिक आहे. लाचखोरीमुळे अनेकदा देशाचे सरकार कोसळलेले आहे, तर सरकार स्थापन झालेलेही आहे. त्यातही या सर्वेक्षणामध्ये देशातील ६३ लोकांना वाटते, ‘सरकार लाचखोरीच्या विरोधात काम करत आहे.’ पूर्वीच्या काँग्रेसच्या राज्यापेक्षा आता भ्रष्टाचार आणि घोटाळे यांचे प्रमाण नगण्यच झाले आहे, हे मान्य करावे लागेल; मात्र खालच्या स्तरावर अजूनही पोलीस, प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांना लाच दिल्याविना काही काम होतच नाही, ही वस्तूस्थिती आहे. लाचखोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे; मात्र त्याची आकडेवारी पहाता कारवाईच्या घटना फारच अल्प आहेत आणि त्या पलीकडे जाऊन संबंधितांना शिक्षा होण्याचे प्रमाण त्याहून नगण्य आहे, म्हणजे देशात जितक्या मोठ्या प्रमाणात लाचखोरी दिसते, तितक्या प्रमाणात कारवाई होत नाही अन् शिक्षाही होत नाही. त्यामुळे ती थांबण्याची शक्यता अत्यंत अल्पच म्हणावी लागेल. याला कारण लाच मागणारा आणि देणारा दोघांनाही त्यांचे हित साध्य करायचे असते. काही वेळेस अयोग्य गोष्टीसाठी लाच दिली जाते, तर काही वेळेस कायदेशीर गोष्ट असतांनाही ती करण्यासाठी लाच मागितली जाते आणि संबंधिताला लाच दिल्याविना काम होणार नाही, हे ठाऊक असल्याने अन् याला विरोध करण्यासाठी त्याच्याकडे वेळ, श्रम आणि पैसा नसल्याने तो ती लाचखोरी मान्य करतो, असेच सध्या देशातील चित्र आहे. त्यातील आता अनेक कामे डिजिटल होत असल्याने त्याचे प्रमाण अल्प होण्याची शक्यता वाढली आहे. बरेच ठिकाणी ओळखीच्या माध्यमातून काम करून घेण्याचा प्रयत्न होत असतो. त्यात राजकीय आणि अधिकार्याची ओळख, मंत्र्यांची चिठ्ठी आदींच्या माध्यमांतून कामे करवून घेतली जातात. असे केले नाही, तर अनेकांची कामे होत नाहीत आणि सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. देशात असे करणार्यांची संख्या ४६ टक्के आहे.
ईश्वरी अधिष्ठान असलेले संघटित प्रयत्न हवेत !
भारतातील लाचखोरीची वाढती टक्केवारी न्यून करण्यासह ती कायमची कशी नष्ट करता येईल, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावा लागणार आहे. तसे सध्याच्या स्थितीत तरी अशक्यच गोष्ट दिसत आहे. यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल आणि जनतेला त्यागही करावा लागेल. असा संघर्ष आणि त्याग करण्याची जनतेची मानसिकता अन् एकूणच सिद्धता दिसत नाही, असेच लक्षात येते. जनतेला कामे झालेली हवी आणि ती होत नसतील, तर त्यासाठी लाच देण्याचीही सिद्धता आहे. ‘काम झाले नाही, तरी चालेल; मात्र लाच देणार नाही आणि लाचखोरी मोडून काढीन’, अशी संघर्ष करण्याची सिद्धता जनतेमध्ये निर्माण करावी लागेल. ती निर्माण करण्यासाठी चारित्र्यवान लोकांची आवश्यकता आहे. तसे देशाच्या राजकीय पटलावर तरी कुणीच दिसत नाही. कुणी ना कुणी कोणत्या न कोणत्या कारणासाठी भ्रष्टाचार करत आहे, असेच जनतेला वाटते आणि ते अयोग्य आहे, असेही म्हणता येत नाही. अशा स्थितीत लाचखोरी आणि भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी प्रामाणिक लोकांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. तसेच देशात प्रामाणिकपणा, चारित्र्य यांविषयीचे संस्कार होण्यासाठी समाजमनावर धर्मशिक्षणाचे संस्कार होणे आवश्यक आहे. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतील. जर नागरिकांनी संघटित होऊन याविरोधात लढा दिला, तर यश मिळू शकते, तसेच अशा लढ्याला ईश्वरी अधिष्ठान असेल, तर यशाची निश्चिती बाळगता येते.