सहजता आणि सर्वांशी जवळीक साधणारे चि. सागर गरुड अन् काटकसरी आणि कोणत्याही प्रसंगात स्थिर रहाणार्या चि.सौ.कां. पूजा जठार !
२७.११.२०२० या दिवशी देवद आश्रमात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा करणारे चि. सागर गरुड आणि आश्रमात सेवा करणार्या चि.सौ.कां. पूजा जठार यांचा शुभविवाह आहे. ते दोघेही पूर्णवेळ साधना करत आहेत. त्यांच्या विवाहानिमित्त संत, कुटुंबीय आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. सागर गरुड आणि चि.सौ.कां. पूजा जठार यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
चि. सागर गरुड यांची गुणवैशिष्ट्ये !
१. उत्साही आणि आनंदी
‘सागर सतत उत्साही आणि आनंदी असतो. त्याला कधीही दूरभाष केला, तरी त्याचे बोलणे ऐकून पुष्कळ आनंद होतो. त्याच्याशी बोलतांना मनावरील ताण विसरायला होतो.
२. सहजता आणि मनमोकळेपणा
अ. तो मनाने पुष्कळ निर्मळ आणि मनमोकळा असल्याने त्याच्याशी सर्वकाही बोलावेसे वाटते. त्याच्याशी बोलल्याने मन हलके होते. तो इतरांशी पटकन जवळीक साधतो. त्यामुळे त्याच्याविषयी प्रेम वाटते.’ – सौ. सानिका गावडे (चुलत बहीण), कोल्हापूर सेवाकेंद्र
आ. ‘सागर हा प्रीतीचा सागर आहे’, असे वाटते. तो सर्वांशी सहजतेने आणि मोकळेपणाने वागतो. त्यामुळे त्याच्याविषयी जवळीक वाटते. तो मनमिळाऊ आणि प्रेमळ आहे.’ – श्रीमती कमल गरुड (काकू), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३. प्रत्येक कृती परिपूर्ण करणे
‘सागर प्रत्येकच कृती मनापासून आणि परिपूर्ण करतो. ती कृती करतांना त्याला तहान-भूक यांचीही जाणीव रहात नाही. सागर बरेच दिवस घरी एकटाच होता, तरी त्याने घर व्यवस्थित आणि नीटनेटके ठेवले होते.
४. तो स्वतःमध्ये लगेचच पालट करतो. दळणवळण बंदीच्या काळात त्याला आश्रमात रहायला सांगितले होते. तेव्हा तो पाच मास पूर्णवेळ आश्रमात राहिला.
५. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही साहाय्य मागितले, तरी तो लगेचच साहाय्य करतो.’
– सौ. विमल गरुड (आई)
६. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया सहज अन् आनंदाने राबवणे
‘एकदा तो रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसाठी आला होता. त्या वेळी त्याला ‘प्रक्रियेविषयीचा कोणताही ताण आहे’, असे जाणवले नाही. तेव्हा त्याने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया सहज आणि आनंदाने राबवली.
७. तो कोणतीही सेवा करण्यास नेहमी सिद्ध असतो. त्याला सांगितलेली सूत्रे आणि चुका तो लगेचच स्वीकारतो.
८. त्याला मोठ्यांविषयी पुष्कळ आदरभाव आहे. त्याने आम्हाला कधीही उलट उत्तर दिले नाही.’
– श्रीमती कमल गरुड
९. इतरांचा विचार करणे
‘सागरदादा कुटुंबातील सदस्यांना प्रेमाने समजून घेतात. मध्यंतरी त्यांचे मोठे भाऊ (श्री. संतोष गरुड, (चुलत भाऊ)) रुग्णाईत असतांना ‘त्यांना त्रास होऊ नये’, यासाठी त्यांनी थोडक्यात विचारपूस करून भ्रमणभाष ठेवला. नंतर भाऊ बरा झाल्यानंतर ते सविस्तर बोलले. यामागे ‘त्यांच्या दादाला बोलण्याचा त्रास होऊ नये, त्याला पुरेशी विश्रांती मिळावी’, हा हेतू होता.
१०. त्यांच्याकडून चूक झाल्यास ते सहजतेने क्षमा मागून ‘अजून काय करू ?’, असे विचारतात.
११. शिकण्याची वृत्ती
मागील मासात घरी असतांना त्यांना दही लावायचे होते. त्यासाठी त्यांनी भ्रमणभाष करून ते मला विचारून घेतले. त्या वेळी त्यांनी त्यातील बारकावेही समजून घेऊन त्याप्रमाणे कृती केली.
१२. परेच्छेने वागणे
एखादा निर्णयही ते घरातील सर्वांना विचारून घेतात. ‘तुम्ही सांगाल तसे !’, असे ते म्हणतात. खरे तर मनाविरुद्ध वागणे कठीण असते; पण त्यांनी ते साधनेच्या माध्यमातून साध्य केले आहे.
१३. ‘त्यांची अंतर्मनातून साधना चालू आहे’, असे जाणवते.
१४. स्वतःला पालटण्याची तळमळ
स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेसाठी रामनाथी आश्रमात असतांना त्यांनी सर्वांना स्वतःतील स्वभावदोष सांगितले आणि ‘मला साहाय्य करा’, अशी विनंती केली.
१५. संतांप्रतीचा भाव
प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांच्यावर त्यांची अपार श्रद्धा आहे. ‘बर्याचदा प.पू. दास महाराज त्यांची विचारपूस करतात, हे मी त्यांना सांगितल्यावर त्यांची भावजागृती होते अथवा त्यांना भ्रमणभाष केल्यावर समजते, ‘२ – ४ दिवसांपूर्वीच सागरदादांनाही प.पू. दास महाराजांची आठवण आलेली असते.’
– सौ. समृद्धी गरुड (चुलत भावाची पत्नी), पर्वरी, गोवा. (१३.११.२०२०)
लग्नानिमित्त सागरभाऊजींसाठी कृष्णाला प्रार्थना ।
कृष्णा, तुझे लेकरु तुझ्या चरणांशी आले ।
प्रारब्ध फेडाया पुढे चालले ॥ १ ॥
कृष्णा, आशीर्वाद दे नवदांपत्यास ।
चालू दे मोक्षाची वाट ।
संसारकर्तव्य तुझ्या चरणांचे घडू दे ॥ २ ॥
मायेतील संसार प्रारब्धाचा ।
चरणांशी संसार मोक्षाचा ।
स्मरण सतत तुझेच राहु दे ॥ ३ ॥
हीच प्रार्थना शुभघडीला ।
कृष्णा, तुझे लेकरू तुझ्या चरणांशी आले ॥ ४ ॥
– सौ. समृद्धी गरुड (चुलत भावाची पत्नी), पर्वरी, गोवा. (१३.११.२०२०)
चि. सागर गरुड यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
देवद आश्रमातील शिवाजी कुंडलेकाका यांचे आजारपणामुळे नुकतेच निधन झाले. ‘त्यांच्या आजारपणात त्यांना पुण्याला रुग्णालयात नेणे, तेथे त्यांना साहाय्य करणे, त्याविषयीचा समन्वय पहाणे’ इत्यादी विविध सेवा श्री. सागर गरुड यांनी आनंदाने केल्या. त्या वेळी श्रीमती कुंडलेकाकूंना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. शिकण्याची वृत्ती
‘पुण्याला काकांच्या समवेत रुग्णालयात असतांना ‘त्याला काकांकडून काय काय शिकायला मिळत आहे ?’, हे तो मला भ्रमणभाषवर सांगत असे.
२. कठीण परिस्थितीत स्थिर आणि शांत रहाणे
कुंडलेकाका रुग्णालयात असतांना अत्यंत गंभीर परिस्थितीतही तो शांत आणि स्थिर होता, तसेच त्याने मलाही व्यवस्थित सांभाळले. १९.९.२०२० च्या रात्री तो कुंडलेकाकांना घेऊन पुण्याहून देवद आश्रमात परत येत असतांना मध्यरात्री १२-१२.३० वाजता गाडीचे टायर अकस्मात् फाटले. तेव्हाही त्याने प्रसंगावधान राखून गाडी महामार्गावरून कच्च्या रस्त्यावर घेतली आणि भ्रमणभाषच्या प्रकाशात एकट्याने टायर पालटले अन् रात्री २ वाजता ते आश्रमात पोचले.
३. उत्तरदायित्वाची जाणीव असणे
संतांनी कुंडलेकाकांच्या आणि माझ्या सेवेविषयी जे सांगितले, ते त्याने लगेच अन्य एका साधकाला सांगितले आणि त्याप्रमाणे आम्हाला साहाय्य करण्यासाठी त्याला उपयुक्त सूचनाही दिल्या.
४. संतांप्रतीचा भाव
कुंडलेकाकांसाठी नामजपादी उपाय विचारून घेण्यासाठी त्याला सद्गुरु गाडगीळकाकांना भ्रमणभाष करावा लागत असे. त्यामुळे सद्गुरु काकांचा सत्संग मिळाल्याविषयी त्याला अत्यंत कृतज्ञता वाटायची.’
– श्रीमती कमलिनी कुंडले, सनातन आश्रम, देवद पनवेल. (६.११.२०२०)
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संबंधी सेवा करणार्या साधकांना चि. सागर गरुड यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. इतरांना सहजतेने हाताळणे आणि प्रोत्साहन देणे
१ अ. ‘समोरच्याला ताण येणार नाही’, अशा पद्धतीने चूक सांगणे : ‘इतरांना चूक सांगत असतांना त्यांना ताण येणार नाही’, याची काळजी दादा घेतो. काही वेळा त्याला समोरच्या साधकाविषयी प्रतिक्रिया आली असेल किंवा त्याचे अयोग्य वाटत असेल, तरीही त्याविषयी तो शांतपणे सांगण्याचा प्रयत्न करतो.
१ आ. नवीन सेवा शिकवतांना साधकाला प्रोत्साहन देणे आणि त्याचा आत्मविश्वास वाढवणे : ‘कुठली सेवा कोणता साधक चांगल्या प्रकारे करू शकतो आणि ती त्याच्याकडून कशी करवून घेता येईल, म्हणजे संबंधित साधकालाही आनंद कसा मिळेल, त्याचा आत्मविश्वास कसा वाढेल आणि पुढच्या वेळी तो उत्साहाने सेवा कशी करील’, याचा अभ्यास करणे आणि तशी कृती करणे’ दादाला योग्य प्रकारे जमते.
नवीन सेवा इतरांना देतांना ‘त्यांना शिकायला मिळावे’, यासाठी तो प्रोत्साहन देतो आणि सेवेनंतर ‘ती आणखी चांगली कशी करू शकतो ?’, हे स्वतः कृतीतून दाखवतो.
२. सर्वांना आपलेसे करणे
गेल्या वर्षी सागरदादा कन्नड भाषेतील विज्ञापने करणार्या साधकांसाठी शिबिर घ्यायला सनातनच्या मंगळुरू सेवाकेंद्रात प्रथमच गेला होता. तो तेथे २ – ३ दिवस थांबणार होता. दादाला कन्नड भाषा येत नव्हती, तरी तेथील सर्वांशी दादाची जवळीक झाली. शिबिरातील काही साधक अजूनही सेवेत काही अडचणी असतील, तर दादाला हक्काने संपर्क करतात.
३. सेवेची तळमळ
३ अ. सेवेतील परिपूर्णता
१. दैनिकाच्या संदर्भातील कुठलीही सेवा, उदा. पानांची संरचना करणे, विज्ञापनांची आकर्षक संरचना करणे, विशेषांकासाठी मुखचित्र (हेडर) सिद्ध करणे इत्यादी सर्व सेवा दादा उत्कृष्ट पद्धतीने करतो.
२. दैनिकाशी संबंधित कोणतीही नवीन सेवा आली की, प्रथम त्याचेच नाव समोर येते; कारण ‘सागर ही सेवा चांगलीच करणार’, याची सर्वांना निश्चिती असते.
३ आ. सेवेतील गतीमानता : दादाची सेवा करण्याची गती पुष्कळ आहे. एखादी सेवा करायला साधकांना १ घंटा लागत असेल, तर तो ती सेवा ३० ते ३५ मिनिटांत पूर्ण करतो आणि उरलेला वेळ ती सेवा अधिक कौशल्यपूर्ण करण्यासाठी देतो. त्यामुळे त्याची सेवेची फलनिष्पत्ती अधिक असते.
३ इ. सेवेतील कलात्मकता : दैनिकाशी संबंधित सेवा अधिकाधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी तो प्रयत्नरत असतो. त्याने संरचना केलेले दैनिकाचे पान किंवा विज्ञापनातील मजकुराची मांडणी, चित्रांची केलेली निवड आणि एकूणच सादरीकरण चांगल्या दर्जाचे असते. ते पाहूनच त्याकडे आकृष्ट झाल्यासारखे होऊन संबंधित लिखाण आपसूकच वाचावेसे वाटते.
४. स्वभावदोषांच्या तीव्रतेची जाणीव झाल्यावर खंत वाटून प्रामाणिक प्रयत्न करणे
एकदा दादाला त्याच्या काही स्वभावदोषांविषयी जाणीव करून दिली होती. त्या रात्री त्याला झोपच लागली नाही. ‘इतरांना आपल्यामुळे पुष्कळ त्रास झाला आणि आपली साधनाही व्यय झाली’, याची त्याला पुष्कळ खंत वाटली. त्याच वेळी त्याने ‘स्वभावदोषांविषयीची अयोग्य मानसिकता आणि त्यावरील योग्य दृष्टीकोन’ याचे चिंतन लिहून काढले अन् दुसर्या दिवशी उत्तरदायी साधिकेला दाखवले, तसेच ‘प्रयत्नांची दिशा कशी असावी ?’, याविषयीही विचारून घेऊन तसे प्रयत्न चालू केले. तीव्र खंत वाटून केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे केवळ १५ ते २० दिवसांतच त्याच्यात संबंधित स्वभावदोषांच्या अनुषंगाने चांगला पालट दिसू लागला. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनीही दादातील हा पालट आमच्या सर्वांच्या लक्षात आणून देऊन दादाचे कौतुक केले.
५. भाव
५ अ. परात्पर गुरुदेवांप्रती असलेला कृतज्ञताभाव : एकदा व्यष्टी आढाव्यात ‘परात्पर गुरुदेवांनी आपल्यासाठी काय काय केले आहे ?’, याविषयी कृतज्ञता लिहून आणण्यास सांगितली होती. त्या वेळी सागरदादाने मोजकेच प्रसंग लिहिले होते; परंतु ते सांगतांना त्याचा आणि ऐकणार्यांचाही भाव जागृत होत होता.
५ आ. दादामध्ये अव्यक्त भाव असल्याचे जाणवते. ‘सेवा चांगली होण्यासाठी त्याचे अंतर्मनापासून प्रयत्न चालू असतात’, असे वाटते.
५ इ. तो भावप्रयोग घेत असतांना त्याच्या अंतरातील भावाची प्रचीती येते. ‘भावप्रयोग संपूच नये’, असे वाटते. तो भावप्रयोगात सांगत असलेली वाक्ये जशीच्या तशी अनुभवता येतात.’
– दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संबंधी सेवा करणारे सर्व साधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
६. कोरोनामुळे बाहेर प्रतिकूल स्थिती असतांनाही आश्रमातील आजारी साधकाच्या सेवेसाठी रुग्णालयात जाण्यास सहजपणे सिद्ध होणे आणि तेथे आजारी साधकाची सेवा मन लावून करणे
आश्रमातील एका काकांना रुग्णालयात भरती करायचे होते. त्यांना पुष्कळ थकवा आल्याने रुग्णालयात सर्व प्रकारचे साहाय्य लागणार होते. कोरोनाच्या कालावधीमध्येच अन्य रुग्णालयात जावे लागणार असल्याने सर्वांच्या मनात काही प्रमाणात भीती होती; पण सागरदादाला या सेवेविषयी विचारल्यावर तो ही सेवा करण्यास लगेच सिद्ध झाला. जणू ‘स्वतःच्याच वडिलांना रुग्णालयात घेऊन जाणार आहे’, अशा पद्धतीने त्याने होकार दिल्याचे जाणवले. काकांना रुग्णालयात नेणे प्राधान्याचे असल्याने त्याने त्याच्या वैयक्तिक कामांचे नियोजन पुढे ढकलले. रुग्णालयात त्याने काकांची मन लावून सेवा केली. तेथे त्याला ‘आधुनिक वैद्यांना संपर्क करणे, काकांना तपासणीसाठी नेणे’ अशा प्रकारे धावपळही करावी लागली; पण त्याने ते सर्व आनंदाने स्वीकारले. काकांना रुग्णालयातून आश्रमात आणल्यावर पुन्हा काही दिवसांनी तेथे न्यायचे होते. याविषयी त्याला विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘तुम्ही सांगितले आणि मी ‘नाही’ म्हटले, असे कधी होणार नाही. मला या सेवेतून पुष्कळ शिकायला मिळाले आणि आनंदही अनुभवता आला.’’ त्याचे हे बोलणे ऐकून मला भरून आले.
– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.११.२०२०)
चि.सौ.कां. पूजा जठार यांची गुणवैशिष्ट्ये !
पू. (सौ.) अश्विनी पवार यांना चि.सौ.कां. पूजा जठार यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. सातत्य
‘पूजाला एखादी सेवा दिली असेल, तर ती प्रतिदिन त्या सेवेतील प्रत्येक गोष्ट बारकाव्यानिशी करते. कितीही उशीर झाला, तरी ती सेवा पूर्ण करते.
२. काटकसर
पूजाच्या आवश्यकता अल्प आहेत. तिच्याकडे कधीच भरमसाठ कपडे किंवा साड्या नसतात, तसेच गरजेच्या वस्तूही आवश्यक तेवढ्याच असतात. ती अनावश्यक खरेदी करत नाही. ‘आपल्याला काय आवश्यक आहे ?’, याचा अभ्यास करून ती आवश्यकतेनुसार खरेदी करते आणि वापरते.
३. सेवेतील सहजता, सुंदरता आणि परिपूर्णता
तिच्याकडे मला जेवण देण्याची सेवा आहे. ती मला जेवढे लागते, अगदी तितकेच जेवण आणते. तिने आणलेल्या जेवणात मला एखादा पदार्थ अधिक झाला; म्हणून बाजूला ठेवावा लागत नाही किंवा अल्प पडले; म्हणून पुन्हा मागायलाही लागत नाही. ती सेवा मनापासून करते. तिने आणलेल्या जेवणाच्या ताटातील अन्नपदार्थांची रचना पाहून मन प्रसन्न होतेे. महाप्रसाद ग्रहण करतांनाही भाव जाणवतो. ती इतक्या सहजपणे आणि आत्मीयतेने ही सेवा करते की, ‘ती जेवणाचे ताट कधी घेऊन येते आणि कधी घेऊन जाते ?’, ते कळतही नाही.
४. सतत सेवारत रहाणे
ती अधिकाधिक सेवारत रहाण्याचा प्रयत्न करते. ती कधी अनावश्यक झोपत नाही किंवा वेळ वाया घालवत नाही.
५. मनात सेवेप्रती भाव असणे
तिला कोणतीही सेवा दिली, तरी ती कधीच ‘नाही’ म्हणत नाही. काही सेवा तिने यापूर्वी केलेल्या नसतात, तसेच काही सेवा कठीण असतात. तिला त्याचा ताण येत नाही. मिळालेली प्रत्येक सेवा ती आनंदाने आणि मनापासून करते. तिच्या मनात गुरुसेवेप्रती भाव आहे. गुरुसेवेचे मूल्य समजल्यामुळे ‘ती त्यात टाळाटाळ करणे किंवा सवलत घेणे’, असे करत नाही.’
– (पू.) सौ. अश्विनी पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.११.२०२०)
चि.सौ.कां. पूजा जठार यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. सौ. उल्का जयंत जठार (आई)
१ अ. शांत स्वभाव : ‘पूजा मुळातच पुष्कळ शांत स्वभावाची आहे. लहान असल्यापासून जर ती कधी आजारी पडली, तर शांत झोपून रहात असे. ती कधी रडत नसे किंवा ‘आई, तू माझ्याजवळ बस’, असे ती कधीच म्हणत नसे. त्या वेळी मी घरातील सर्व सेवा झाल्यानंतर उठून तिला खाऊ घालत होते. तेव्हाही तिने कुठलीच गोष्ट रडून मागून घेतली नाही.
काही कारणावरून तिचे बाबा तिला काही बोलले, तरी ती कधीच उलट बोलायची नाही. ती नेहमी शांत रहात असे.
१ आ. काटकसरीपणा
१. एकदा मी पूजासाठी दोन पोषाख खरेदी केले होते. तेव्हा पूजा मला म्हणाली, ‘‘आई, एकच पोशाख घ्यायला पाहिजे. एकाच वेळी दोन पोशाख कशाला घेतलेस ?’’
२. कपडे खराब झाले, तरी ती ते घालते. त्या वेळी ती म्हणते, ‘‘मला ते चांगलेच वाटतात. ‘टाकून द्यायला नको’, असे वाटते.’’
१ इ. समंजस : मी सेवेत व्यस्त असते. त्यामुळे ‘मी तिला दूरभाष केला पाहिजे’, असे तिला कधीच वाटत नाही. तिच्या वाढदिवसाच्या दिवशीही ती स्वतःहून दूरभाष करून मला म्हणते, ‘‘आई, आज माझा वाढदिवस आहे. मी तुझा आशीर्वाद घेण्यासाठी दूरभाष केला आहे.’’ तेव्हासुद्धा ‘मी तिला दूरभाष केला पाहिजे’, असे तिला कधीच वाटत नाही.
१ ई. आरंभीपासूनच ‘तिचा आणि आमचा देवाण-घेवाण हिशोब अल्प आहे’, असे जाणवते.
१ उ. सेवेची तळमळ : पूजा पूर्णवेळ साधना करू लागल्यापासून वर्षातून एकदा दीपावलीच्या वेळी ती आश्रमातून घरी येते. त्या वेळी ती आश्रमातून सेवा घेऊन येते आणि सेवा करते. ती घरी रहायला आल्यापासून आठ दिवसांतच आश्रमात जाण्यासाठी निघते. ती म्हणते, ‘‘मला एवढ्या सेवा आहेत. मी येथे थांबून काय करू ?’’
१ ऊ. लहान असतांना पूजाची प्रकृती बरी नसणे आणि ‘त्यातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच ती वाचली आहे’, असे वाटणे : पूजा २ वर्षांची असतांना मी तिला उठवायला गेले. तेव्हा ती बेशुद्धावस्थेत होती. तिच्या प्रकृतीविषयी आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘४८ घंट्यांत काय होईल ?’, हे आम्ही सांगू शकत नाही.’’ ‘त्यातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच तिच्या पुढील साधनेच्या प्रवासासाठी ती वाचली आहे’, असे मला वाटते.’
२. श्री. जयंत जठार (वडील)
अ. ‘घरी आल्यावरसुद्धा ती ‘सर्वच सेवा आश्रमसेवा आहेत’, या भावाने आणि परिपूर्ण करते.
आ. कुणाचे काही चुकत असेल, तर ती त्यांच्या चुका त्यांना प्रेमाने सांगते.’
३. श्री. जयदीप जठार (भाऊ) आणि सौ. माया सबसगी (चुलत बहीण)
अ. ‘घरातील आणि बाहेरील सर्वांशीही ती पुष्कळ प्रेमाने बोलते.
आ. ती सर्वांशी आदराने बोलते. त्यांच्याशी आदरभाव ठेवून वागते.’
४. सौ. प्रियांका जयदीप जठार (वहिनी)
४ अ. ‘कोणत्याही प्रसंगात त्या शांत राहून निर्णय घेतात. इतरांशीही त्या शांतपणे आणि त्यांना समजेल, अशा शब्दांत बोलतात.
४ आ. नीटनेटकेपणा : आश्रमातील सेवेच्या व्यस्ततेमुळे त्यांना कपड्यांना इस्त्री करणे शक्य होत नाही; परंतु त्यांचे कपडे प्रत्येक वेळी इस्त्री केल्याप्रमाणे व्यवस्थितच असतात.
४ इ. त्यांची माझ्याकडून कोणतीच अपेक्षा नसते.’
चि.सौ.कां. पूजा जठार यांची सहसाधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. ‘सतत हसतमुख तोंडवळा ठेवण्याचा पूजाचा प्रयत्न असतो. ती पुष्कळ सकारात्मक आणि समजूतदार आहे.’
– सौ. आनंदी पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
२. स्वयंशिस्त
‘ती सकाळी सेवेसाठी वेळेत येते. त्यामध्ये ती सवलत घेत नाही, तसेच नियमितची खोली स्वच्छता इत्यादी सेवा ती वेळेत पूर्ण करते.’ – सर्व सहसाधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
३. स्थिरता
‘पूजाताई मुळातच स्थिर प्रकृतीच्या आहेत. त्या प्रसंगांना स्थिरतेने आणि शांतपणे सामोर्या जातात. त्यांच्या तोंडवळ्यावर कोणतेही अनावश्यक हावभाव अथवा भावना नसतात.’
– श्री. विनायक आगवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
४. तिला कोणतेही सूत्र विचारले, तर ती तिच्या क्षमतेप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करते. ती कधीच कुणाला टाळत नाही.’
– सौ. आनंदी पांगुळ
देवद आश्रमातील सहसाधकांना चि.सौ.कां. पूजा जठार यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. व्यष्टी साधनेचा आढावा प्रेमाने आणि इतरांना समजून घेऊन घेणे
‘पूजाताई वर्ष २०१८ आणि २०१९ मध्ये आमच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत असे. तिच्या आढाव्याला जातांना मला उत्साह वाटत असे. आमच्याकडून व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या अनुषंगाने अपूर्ण रहाणारी सूत्रे ती पुष्कळ प्रेमाने सांगत असे. तिचे रागावणेही फार हळूवार असे. तिचे बोलणे पुष्कळ लाघवी असल्याने आणि तिच्या तळमळीने सांगण्याने मला माझ्या चुकांची लगेचच खंत वाटत असे. ‘आढाव्यात तिने सांगितलेले आम्हाला समजले कि नाही ?’, हे ती वारंवार विचारून जाणून घेत असे. एखादा दृष्टीकोन आम्हाला समजेपर्यंत ती सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करत असे. खरेतर आमच्या गटात सगळे तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले आणि वयाने मोठे असलेले साधक होते. ती आम्हा सर्वांना व्यवस्थित समजून घेऊन आमच्या स्तराला येऊन दृष्टीकोन सांगत असे. आढाव्याच्या काळात मला तिच्याकडून अनेक लहान लहान सूत्रे शिकता आली.
२. सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे
‘आश्रमात संतसोहळा, अन्य मोठे कार्यक्रम, निरनिराळे विधी यांसंबंधित सेवा असतात. अशा सेवांमध्ये बारकाव्यांनिशी करण्याच्या बर्याच सेवा असतात. त्या सेवा पूजा पुष्कळ भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्यासाठी धडपडत असते. त्यासाठी ‘प्रत्येक टप्प्याला विचारून घेणे, तपाससूचीचा वापर करणे’, या गोष्टी ती नियमित करते. त्यामुळे तिच्याकडून सेवेत त्रुटी रहात नाहीत. ‘आपल्याकडून एकही गोष्ट सुटायला नको’, असा तिचा सतत प्रयत्न असतो, तसेच तिच्या मनात परिपूर्णतेचा ध्यास असतो. त्यामुळे तिची सेवा चांगली होते.
३. चांगल्या प्रकारे सेवा करून साधकांचा विश्वास संपादन करणे
आश्रम स्तरावर काही सेवांची घडी अजून बसलेली नाही. त्यामुळे ‘त्या सेवेची पूर्ण व्याप्ती समजून घेणे, तिची घडी बसावी’, या दृष्टीने वेळ देणे, विचारून घेणे, सांगितलेली सूत्रे पूर्ण करून त्या सेवेचा आढावा देणे’ इत्यादी गोष्टी ती सहजपणे करते. त्यामुळे ‘तिला कोणतीही सेवा दिली, तरी ती चांगली करील’, अशी समोरच्याला निश्चिती असते.
४. चिकाटी
कधी आध्यात्मिक त्रास होत असेल अथवा शारीरिक स्थिती बरी नसेल, तरीही ती सतत सेवारत रहाते. ती स्वतःच्या मनाच्या आणि शरिराच्या स्थितीचा सेवेवर परिणाम होऊ देत नाही.
काही वेळा बुद्धीची सेवा करतांना सुचत नसेल, तरीही ‘अशा स्थितीत मी काय केले, तर माझी सेवा चांगली आणि फलनिष्पत्तीसह होईल ?’, अशी तिची विचारप्रक्रिया असते. त्यासाठी ती चिकाटीने प्रयत्न करते.
५. सेवेची तळमळ
बर्याचदा साधकसंख्येच्या अभावामुळे स्वतःच्या दायित्व असलेल्या सेवांच्या व्यतिरिक्त आश्रम स्तरावरील अन्य सेवांचे दायित्व तिच्याकडे असते. अशा परिस्थितीत ‘मला अधिक सेवा होत आहे अथवा मी करू शकत नाही’, असे तिला वाटत नाही. त्यातही तिच्या क्षमतेचा ती पूर्ण वापर करते. ती सतत कृतीशील रहाते.
६. स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण वापर करणे
‘सेवेच्या अंतर्गत वेळोवेळी विचारून घेणे, त्याचा आढावा देणे’ यांविषयी ती सतर्क असते. काही वेळा स्वतःच्या दायित्वाच्या सेवेअंतर्गत ज्या सेवा समयमर्यादा घालून करायच्या असतात, त्यासाठी जोडून दिलेले सहसाधक काही अडचणींमुळे उपलब्ध नसतात. अशा बर्याच प्रसंगांत त्या परिस्थितीविषयी तक्रार न करता ‘स्वतःच्या स्तरावर सर्व कृती कशा करू शकतो ?’, यासाठी ती प्रयत्न करते.
७. ती सेवांचे नियोजन कौशल्याने करते. ती सर्व सेवा आणि वैयक्तिक कृती नियोजनाप्रमाणे पूर्ण करते.’
– सेवा करणारे सहसाधक (८.११.२०२०)