कोरोनाच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणार्या आस्थापनांवर कारवाई ! – सांगली महापालिका आयुक्त
सांगली – सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकाने, टपर्या, हातगाड्या, वाणिज्य आस्थापने इ. ठिकाणी सॅनिटायझरची सोय केली जात आहे किंवा नाही, याची पडताळणी केली जाईल. सदर आस्थापनांमधील लोक मास्कचा वापर करत आहेत किंवा नाहीत ? सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करत आहेत किंवा नाहीत ? याची पडताळणी केली जाईल. ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नाहीत किंवा कोरोना संबंधीच्या आदेशाचे पालन होत नाही, त्या आस्थापनांना एक लेखी सूचना देऊन ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल. पुन्हा त्याच आस्थापनाकडून उल्लंघन झाल्याचे आढळल्यास नागरी आरोग्याच्या दृष्टीने अशी आस्थापने सील केली जातील, अशी चेतावणी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे.