कोल्हापूर येथील नागरिकांच्या दैनंदिन तक्रार निवारणासाठी महापालिकेची ‘टोल फ्री’ सुविधा
कोल्हापूर – येथील नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने १८००-२३३-१९१३ या ‘टोल फ्री’ क्रमांकाची सुविधा चालू केली असून याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. महापालिकेच्या संदर्भातील गटार स्वच्छ करणे, औषध फवारणी, कचरा उठाव, किरकोळ स्वरूपाचे अतिक्रमण, पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील तक्रारी, विजेच्या खांबांवर बल्ब बसवणे, स्वच्छता आणि आरोग्य यांच्या संदर्भातील तक्रारींसाठी नागरिकांनी महापालिकेत न जाता स्वतःच्या निवासस्थानाहून तक्रार नोंद करावी. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केल्यानंतर त्यांच्या भ्रमणभाषवर लघुसंदेशाद्वारे कळवण्यात येणार आहे. आतापर्यंत ६ सहस्र ३३८ तक्रारी प्रविष्ट करण्यात आले असून ६ सहस्र ३११ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.