राज्यातील कोळसा वाहतूक निम्म्याने घटवणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
गोवा – मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवरही चर्चा झाली. बैठकीत अनेक मंत्र्यांनी या प्रकल्पांना होत असलेल्या विरोधाचे सूत्र मांडले. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘या प्रकल्पांविषयी केंद्राशी समन्वय करून अपेक्षित निर्णय घेण्याचे अधिकार मंत्रीमंडळाने मला दिलेले आहेत. याविषयी केंद्राकडे वेळोवेळी समन्वय केला जात आहे. राज्यातील कोळसा वाहतुकीत निम्म्याने घट केली जाणार आहे. मुरगाव बंदरातून कोळशाऐवजी अन्य वस्तूंची वाहतूक करता येऊ शकते का, याविषयी विचारविनियम केला जात आहे. बंदरातील कोळसा वाहतूक एकाच वेळी बंद करता येणार नाही. ‘मुरगाव पोर्ट ट्रस्ट’वर दीड सहस्र कुटुंबे आणि ४ सहस्र ५०० निवृत्तीवेतनधारक अवलंबून आहेत. याविषयी मी ‘मुरगाव पोर्ट ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि केंद्रीय जलवाहतूक मंत्री मंडवीया यांच्याशी चर्चा केली आहे. राज्याला ४०० केव्हीए क्षमतेच्या तम्नार वीजवाहिनी प्रकल्पाची आवश्यकता आहे.’’