पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून खाली खेचण्याचे ‘गोंयचो एकवट’ संघटनेच्या बैठकीत आवाहन
(म्हणे) ‘फादर स्टेन स्वामी यांना अनधिकृत खाणींना विरोध केल्यावरून अटक !’
मडगाव, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यात ३ महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून खाली खेचण्याचे आवाहन ‘गोंयचो एकवट’ या संघटनेने केले आहे. ‘गोंयचो एकवट’ या संघटनेचा राज्यातील ३ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना विरोध आहे. या प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाला अनुसरून ‘गोंयचो एकवट’ संघटनेची ५६ वी जागृती बैठक नुकतीच बाणावली येथे झाली. या बैठकीत ‘गोंयचो एकवट’ संघटनेचे समन्वयक कॅप्टन व्हिरियेटा फर्नांडिस यांनी हे आवाहन केले. कॅप्टन व्हिरियेटा फर्नांडिस पुढे म्हणाले, ‘‘वर्ष २०१३-१४ मध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांची गोव्यात मेरशी येथे पहिल्यांदाच सभा झाली होती आणि या सभेनंतर ते पंतप्रधान झाले होते. आता त्यांना पदावरून खाली आणण्याची वेळ आली आहे.’’
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने हल्लीच भीमा-कोरेगाव एल्गार परिषदेच्या प्रकरणात फादर स्टेन स्वामी यांना कह्यात घेतले आहे. फादर स्टेन स्वामी यांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे. फादर स्टेन स्वामी यांना कह्यात घेतल्याच्या सूत्रावरून कॅप्टन व्हिरियेटा फर्नांडिस म्हणाले, ‘‘फादर स्टेन स्वामी यांनी झारखंड येथील अनुसूचित जमतीतील लोकांमध्ये अनधिकृत खाणींच्या विरोधात जागृती केल्याने त्यांना कह्यात घेण्यात आले.’’
(कॅप्टन व्हिरियेटा फर्नांडिस यांना गोव्यात राहून फादर स्टेन स्वामी यांचा नक्षलवाद्यांशी संबंध होता कि नाही, हे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेपेक्षा अधिक कळते का ? फादर स्टेन स्वामी यांना कह्यात घेतल्यावर ओरड करणारे फर्नांडिस कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांना कह्यात घेतले तेव्हा कुठे होते ? कि त्यांना केवळ ख्रिस्ती फादरांशीच देणेघेणे आहे. तसे असेल, तर फर्नांडिस यांनी केरळमध्ये ननचे लैंगिक शोषण करणारे फादर मुलक्कल यांच्याविषयीही बोलायचे धाडस दाखवावे ! – संपादक)