वागातोर समुद्रकिनार्याचे ‘सनबर्न बीच’ असे नामकरण करण्यास स्थानिकांचा आक्षेप
संबंधितांच्या विरोधात कारवाईची मागणी
म्हापसा, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – वंझरात, वागातोर येथील समुद्रकिनार्याचे एका स्थानिक हॉटेलमालकाने ‘सनबर्न बीच’, असे नामकरण केले आहे. सार्वजनिक मालमत्तेच्या या नामकरणास स्थानिकांनी विरोध दर्शवून हणजूण-कायसूय पंचायत, प्रशासन आणि पोलीस यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘वागातोर, हणजूण, कायसुया व्हिलेजर्स फोरम’ या बॅनरखाली घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत स्थानिकांनी ही मागणी केली.
‘वागातोर-हणजूण-कायसुया व्हिलेजर्स फोरम’चे पदाधिकारी म्हणाले, ‘‘गोवा किनारा विभाग व्यवस्थापनाने वंझरात, वागातोर येथील ‘वॉटर्स लाऊंज’ या हॉटेलचे बांधकाम अनधिकृत ठरवून ते पाडण्याचा आदेश दिला होता; मात्र याविषयी कोणतीही कारवाई झालेली नाही. या हॉटेलचालकाने आता दुसर्या नावाने व्यवसाय चालू केला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ‘सनबर्न’ महोत्सव रहित झाल्याचा लाभ उठवत किनारा आणि हॉटेल यांचे नामकरण ‘सनबर्न बीच रिसॉर्ट’ असे करून या ठिकाणी ‘रेव्ह पार्ट्यां’ना प्रारंभ करण्यात आला आहे. स्थानिकांनी स्वत:च्या भूमीत एखादे बांधकाम करून व्यवसाय चालू केल्यास शासन त्यावर त्वरित कारवाई करते; मात्र गोव्याबाहेरील व्यावसायिकांवर कारवाई केली जात नाही. (पोलीस आणि प्रशासन यांत भ्रष्टाचारी असल्यानेच मलिदा खाऊन अनधिकृत बांधकामांना अभय दिले जाते ! – संपादक) समुद्रकिनार्याचे अनधिकृत नामकरण करूनही स्थानिक पंचायत याविषयी गप्प का आहे ?’’