गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार्यांची ‘थर्मल स्क्रीनिंग’ तपासणी चालू
सिंधुदुर्ग – महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे २५ नोव्हेंबरपासून गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्यांचे ‘थर्मल स्क्रीनिंग’ करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तपासणी नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते.
जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावरील सटमटवाडी, बांदा येथील पथकर नाक्याच्या परिसरात महसूल विभाग, पोलीस आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांची मिळून ३ पथके तैनात करण्यात आली आहेत. दुपारपर्यंत ७०० प्रवाशांची तपासणी या ठिकाणी करण्यात आली होती.
यासह दोडामार्ग येथे २ आणि सातार्डा, आरोंदा, रेड्डी अन् आयी या ठिकाणी प्रत्येकी १ पथक तपासणीसाठी तैनात करण्याच्या सूचना २४ नोव्हेंबरला जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत.
‘थर्मल स्क्रीनिंग’ तपासणीच्या वेळी ताप किंवा अन्य लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीची अँटिजेन तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीचा अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आल्यास त्या व्यक्तीला नजिकच्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे.
सौजन्य tv9 मराठी
गोव्यात नियमित कामासाठी ये-जा करणार्यांना ओळखपत्र देणार ! – तहसीलदार म्हात्रे
सावंतवाडी – गोवा राज्याच्या सीमेवर प्रवाशांची तपासणी चालू केल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषतः दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला या तालुक्यांतील गोव्यात नियमित कामाला जाणार्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. जी व्यक्ती नियमित कामानिमित्त गोवा राज्यात जाणार आहे, तिने आपल्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात स्वत:च्या कामाविषयी तपशील आणि आपले ओळखपत्र (आधार कार्ड) द्यायचे आहे. त्याप्रमाणे त्या-त्या ग्रामपंचायतीने, नगरपालिकेने संबंधित तहसीलदार यांना तशी शिफारस केल्यानंतर नियमित ये-जा करणार्यांना ओळखपत्र दिले जाईल, असे सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी स्पष्ट केले.