जिज्ञासू, अहं अल्प असलेले आणि प्रसिद्धीपराङ्मुख असे ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांचा साधनाप्रवास !
जिज्ञासू, अहं अल्प असलेले आणि प्रसिद्धीपराङ्मुख ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांचा साधनाप्रवास !
१.३.२०२० या दिवशी श्री. प्रदीप चिटणीस, ठाणे, महाराष्ट्र यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करण्यात आले. ते मागील २ वर्षे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’अंतर्गत संगीत कलेच्या संशोधनकार्यात तळमळीने सहभागी होत आहेत. किंबहुना त्यांच्यातील साधेपणा आणि निर्मळता यामुळे ‘ते आश्रमातीलच एक आहेत’, असे वाटते.
श्री. प्रदीप चिटणीस हे मागील ३५ वर्षे संगीत साधना करत आहेत. त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी ते संगीताचे वर्ग घेतात. श्री. प्रदीप चिटणीस यांचे गायन भावसागरात डुंबवणारे आहे. कलाकार म्हटले की, त्याला प्रसिद्धी आणि पैसा लवकरात लवकर कमावण्याचा ध्यास असतो; परंतु श्री. प्रदीप चिटणीस यांनी प्रथमपासूनच त्यापासून दूर रहाण्यास प्राधान्य दिले आणि त्यामुळे आज त्यांचे संगीत ईश्वरचरणी रुजू झाले. यामागे ईश्वरी आशीर्वादासह त्यांना लाभलेले योग्य गुरूंचे मार्गदर्शन हेही कारणीभूत आहे. श्री. प्रदीप चिटणीस यांनी केलेले प्रयत्न, त्यांचा संगीत साधनेला झालेला आरंभ, गुरुभेटीची असणारी त्यांची तळमळ आणि त्यांना गुरूंनी केलेले मार्गदर्शन यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.
‘२५ नोव्हेंबरच्या लेखात आपण श्री. प्रदीप चिटणीस यांची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’तील साधिकांशी ओळख होणे, त्यांची रामनाथी आश्रमाला भेट आणि त्यांनी संगीताचे प्रयोग केल्यावर त्याचा साधकांवर झालेला परिणाम, यांविषयीची सूत्रे पाहिली. या अंतिम लेखात श्री. प्रदीप चिटणीस यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांना आश्रमातील साधकांविषयी लक्षात आलेली अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे, यांविषयी जाणून घेणार आहोत.
(भाग ३)
भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/424734.html
भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/425148.html
१२. संगीताच्या प्रयोगाच्या वेळी गातांना आलेल्या अनुभूती
१२ इ. श्री गुरूंना आर्ततेने प्रार्थना केल्यावर दिवसात ५ प्रयोग होऊनही आवाज व्यवस्थित लागून सर्व प्रयोग चांगले होणे : ‘दुसर्या दिवशीही प्रयोग आहे’, हे कळल्यावर मी भीतभीतच ते मान्य केले; कारण पहिल्या दिवशी दिवसाला ५ प्रयोग झाले होते आणि त्यातील शेवटचे २ अति जोरकस (माझ्या नाजूक गळ्याला न परवडणारे) असे झाले होते. मी श्री गुरूंचे मनोभावे स्मरण करून, त्यांना वंदन करून त्यांना अति व्याकुळतेने विनंती केली, ‘हे गुरुदेव, तुम्हीच माझ्या गळ्याचे रक्षण करा. उद्या माझा आवाज व्यवस्थित लागू दे.’ दुसर्या दिवशी माझ्या आवाजाला काहीही झाले नव्हते आणि त्या दिवशीचे सगळेच प्रयोग चांगले झाले.
माझ्यासाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का होता; कारण असे पूर्वी कधी घडले नव्हते. केवळ ‘ईश्वरच माझ्या गळ्यातून गात होता’, याचीच मला प्रचीती आली. संत, गुरु आणि प्रत्यक्ष ईश्वर यांचे अस्तित्व असलेल्या या पवित्र स्थळी मला गायन सेवा करता आली. अहो भाग्यम् ! यानंतरही अनेक प्रयोगांत अशाच अनुभूती येत आहेत.
१२ ई. आध्यात्मिक त्रास नसणार्या साधकांसमोर गातांना ‘देवलोकात गात आहोत’, असे वाटून भावजागृती होणे आणि ‘हेच आपले खरे गायन आहे, आपण ईश्वरासाठी गात आहोत आणि अशा आध्यात्मिक अनुभूती मला अन्य ठिकाणी कधीच आलेल्या नसणे : आध्यात्मिक त्रास नसणार्या साधकांच्या सान्निध्यात गायन करतांना मला ‘मालकंस’, ‘बागेश्री’, ‘जोग’ इत्यादी संथ आणि शांत राग गातांना ध्यानाची अवस्था प्राप्त होते. रागांचे गायन करतांना ‘एकेक स्वर किती आळवू ? किती प्रेमाने कुरवाळू ? त्या रागाचा किती रस प्राशन करू ?’, अशी माझी मनःस्थिती होऊन जाते. काही वेळा मला ‘मी स्वर्गात, देवलोकांतच गायन करत आहे’, असे जाणवते. ज्या ‘गुसाई’ परंपरेत मी गायन शिकलो, त्या गुरुजनांची मला त्या वेळी आठवण होते. ‘हेच आपले खरे गायन आहे. आज आपण ईश्वरासाठी गात आहोत आणि आपण आपल्या गुरु परंपरेला खर्या अर्थाने न्याय देत आहोत’, असे वाटून मला पुष्कळ कृतज्ञता वाटून माझा भाव जागृत झाला. ‘येथे गायन थांबवूच नये’, असे मला वाटते. गायन करतांना अशा आध्यात्मिक अनुभूती मला अन्य ठिकाणी कधीच आल्या नाहीत.
१३. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाशी संपर्क झाल्यावर आलेल्या अनुभूती
१३ अ. ‘व्यवहारात गातांना पैसा, मान आणि प्रसिद्धी मिळवणे’, हे ध्येय असणे; मात्र महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात आल्यावर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे संगीत साधनेसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याने संगीत साधना करण्यात खरा आनंद मिळणे : माझे गायन ‘गुसाई ’ परंपरेतील आहेे. ‘गुसाई’ परंपरेतील पूर्वज हे भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात त्याला प्रसन्न करण्यासाठी गायचे. ‘सभोवतालचे वातावरण आणि एक मोठा गायक होण्याची स्वतःची महत्त्वाकांक्षा, तसेच ‘प्रसिद्धी अन् पैसा मिळावा, मोठमोठ्या संगीत महोत्सवातून नावाजलेल्या रंगमंचांवर गाण्याची संधी मिळावी’, असे माझे विचार असल्याने मी शिकलेल्या गायकीच्या परंपरेचा उद्देश माझ्याकडून विसरला गेला. ‘मला प्रसिद्धी मिळावी’, यासाठी मी प्रयत्नही केले, परंतु त्यात मला अपयश यायचे; म्हणून मी निराशेत जायचो. मी प्रपंच चालवण्यासाठी ‘विमल संगीत साधना’ या नावाने माझ्या आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ वर्ष १९८८ मध्ये गायन-वादन यांचे शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. ईश्वर कृपेने संगीत विद्यालय चांगले चालू होते. माझ्याकडून अनेक विद्यार्थी संगीताविषयी मार्गदर्शन घेऊन गेले. मला विद्यार्थ्यांना शिकवण्यात आनंद वाटे; परंतु ‘माझे कार्यक्रम पाहिजे तसे होत नाहीत, गायक म्हणून नाव मिळत नाही’, अशी खंत मला कायम असायची; मात्र गाण्याची साधना करण्यात मला स्वर्गीय आनंद मिळायचा आणि त्यातूनच मला संगीत उपचाराची कल्पना सुचली. त्याचा अभ्यास आणि संशोधन करत असतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाशी माझा संपर्क आला. मी मान आणि प्रसिद्धी यांच्याकडे न वळण्यामागे कदाचित् ईश्वराचीच इच्छा असावी.
१३ आ. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’, म्हणजे रामराज्यच !’, याची आलेली प्रचीती : संत गजानन महाराजांनी दिलेला संदेश आणि गुरुदेवांनी त्याचे दिलेले उत्तर माझ्या डोक्यात सतत घोळत असायचे. ‘साधना म्हणजे नक्की काय ? ती कशी करायची ?’, हे मला व्यवस्थित समजत नव्हते; परंतु रामनाथी आश्रमातील साधकांशी बोलून आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनामुळे मला थोडे समजू लागले. मला प्रत्यक्ष सत्संगाचा योग आला नाही; पण मोरोपंतांनी म्हटल्याप्रमाणे ‘सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो, कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो ।’ , असे माझ्या संदर्भात घडत गेले. मी प्रती मासाला संगीताच्या प्रयोगांच्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात येत असल्याने आश्रमातील संत आणि साधक यांचा मला पुष्कळ सहवास मिळाला. काही साधक माझे जवळचे बंधू-भगिनी बनले. साधकांच्या वागण्या-बोलण्यातून मी शिकत गेलो आणि माझी विचारसरणी पालटत गेली.
१४. आश्रमातील साधकांविषयी लक्षात आलेली आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
१४ अ. आश्रमातील साधकांचे शांतपणे वागणे : रामनाथी आश्रमात जवळ जवळ २०० ते २५० साधक एकत्र रहातात; पण कुणाचेही आपापसांत वाद किंवा भांडण झालेले मी कधी पाहिले नाही. यातून ‘प्रयत्न केले, तर क्रोधावर नियंत्रण ठेवता येते. शांत रहाता येऊ शकते’, हे मला शिकायला मिळाले.
१४ आ. माझी जराही ओळख नसतांना साधक मला हसतमुखाने ‘नमस्कार’ म्हणून हात जोडायचे. यातून ‘आदर, प्रेमभाव आणि अगत्य कसे असावे ?’, हे मी शिकलो.
१४ इ. साधकांचे नम्रतेचे वागणे पाहून आश्चर्यचकीत होणे : साधकांचे नम्रतेने वागणे पाहिल्यावर ‘स्वतःतील उर्मटपणा आणि रागीटपणा’ यांची जाणीव होऊन माझी शरमेने मान खाली जाते. ‘तुम्ही आलात, आनंद वाटला. प्रवासात काही त्रास नाही ना झाला ?’, अशी साधक माझी आपुलकीने विचारपूस करतात. एकदा एका साधकाचा चुकून मला धक्का लागला (मामुली स्पर्श झाला), तर त्याने ‘क्षमा असावी काका’, असे म्हटल्यावर मी अवाक् झालो; कारण एवढे नम्रतेचे स्वर व्यवहारात मी कधी ऐकलेच नव्हते.
१४ ई. साधकांचे मर्यादशील वागणे : आश्रमात अनेक तरुण मुले-मुली एकत्र सेवा करतात; पण त्यांच्यात कुठेही थिल्लरपणा दिसून येत नाही. साधक भ्रमणभाषवर अनावश्यक गप्पा मारतांना दिसत नाहीत. ‘तरुण वयातही ही मुले किती मर्यादशील रहातात ?’, हे पाहून मला आश्चर्य वाटते. कुणीही साधक अनावश्यक, दुसर्याला दोष देणार्या, दुसर्याची उणीदुणी काढणार्या किंवा दुसर्यावर आरोप करणार्या भाषेत आपापसांत किंवा भ्रमणभाषवर बोलतांना दिसत नाही. प्रत्येक जण सेवा, गुरु, ईश्वर किंवा अध्यात्म याच विषयांवर बोलतांना दिसतो.
१४ उ. प्रत्येक कृती सेवा म्हणून परिपूर्ण आणि एकाग्रतेने करणे : साधक प्रत्येक सेवा मनापासून आणि एकाग्रतेने करतात. प्रत्येक काम ही ईश्वराची सेवा समजून केली जाते. प्रत्येक साधकाची अशी धारणा असल्याने तो सेवा परिपूर्ण करण्याचा जीव तोडून प्रयत्न करतो. ‘मला आता हे करायचा कंटाळा आला आहे’, असे वाक्य मी रात्रीचे ३ वाजताही सतत साधना करणार्या साधकाच्या तोंडून एकदाही ऐकले नाही. प्रत्येक साधक उत्साहाने आणि साधना म्हणून त्याला नेमून दिलेली सेवा करतांना पाहून मी थक्क झालो.
१४ ऊ. प्रयोगाच्या वेळी साधकांनी प्रेमाने, हसतमुखाने आणि एकाग्रतेने तिलक लावणे आणि ते पुसले गेल्यावर न रागावता पुनःपुन्हा तिलक लावणे : संगीत प्रयोगाच्या वेळी साधक मला तिलक लावायचे. साधक मला प्रेमाने, हसतमुखाने आणि एकाग्रतेने तिलक लावायचे. मला मधून मधून कपाळावरून हात फिरवायची सवय होती. त्यामुळे साधकांना प्रयोगांच्या वेळी पुष्कळ वेळा मला तिलक लावावा लागायचा. मला लाजल्यासारखे व्हायचे; परंतु ते साधक नम्रतेने ‘असू दे काका’, असे म्हणत पुनःपुन्हा तिलक लावायचे.
१४ ए. आदरातिथ्य : भोजनकक्षाच्या आतल्या दालनात प्रवेश केल्यावर साधिका ‘काका काय हवे आहे ?’, असे प्रसन्न मुद्रेने आणि तत्परतेने विचारायला यायच्या.
१४ ऐ. एका साधिकेने चहा आणून दिल्यावर तिला चहा चांगला झाल्याचे सांगताच तिने ‘चहा देवाने केला’, असे सांगून कर्तेपणा देवाला दिल्याचे पाहून आश्चर्य वाटणे : एकदा चहा घेण्याची वेळ संपल्यावर मला चहा हवा होता. मी भोजनकक्षात गेल्यावर एका साधिकेला विचारले, ‘‘ताई, चहा आहे का ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘संपला आहे; पण मी तुम्हाला बनवून देते.’’ तिने थोड्याच वेळात मला चहा करून आणून दिला. मी तिला ‘चहा चांगला झाला’, असे सांगितल्यावर त्या मुलीने क्षणाचाही विलंब न करता लगेच सांगितले, ‘‘काका, मी नाही केला. देवाने केला.’ तिच्या या उत्तराने मी अवाक् होऊन तिच्याकडे पहातच राहिलो. त्या मुलीमध्ये गर्वाचा मागमूसही नव्हता. ‘कुठे बाहेरच्या जगातील मुली आणि कुठे ही चिमुकली !’, असे मला वाटले. ‘ती लहान मुलगीही मला असामान्य ज्ञान देऊन गेली’, असे वाटले.
१४ ओ. साधकांमध्ये अहं अल्प असल्याचे जाणवणे : काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर ह्या षड्रिपूंवर प्रत्येक साधकाने विजय मिळवलेला प्रत्ययास येतो; पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘अहंकार’ जो भल्या माणसांनाही आवरत नाही, त्यावर विजय मिळवण्यासाठी साधकांकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळेच मला साधकांत ‘मी’ पणा दिसला नाही.
१४ औ. सनातनच्या आश्रमातील साधक, म्हणजे सद्गुणांची खाणच ! : सरकारी कचेर्यांमधील कामचुकारपणा, आळस, वेळेचा अपव्यय, वेळकाढूपणा येथे दिसून येत नाही. साधक बंधू-भगिनींच्या सहवासात मला जे शिकता आले, ते मी कृतीत आणण्याचा निश्चितच प्रयत्न करत आहे. ईश्वरच माझ्याकडून ते करवून घेत आहे. त्याबद्दल मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा नित्य ऋणी राहीन. अशा प्रकारे येथील साधकांचा सहवास मला मिळत गेला आणि त्यातूनच माझे व्यक्तीमत्त्व घडत गेले.
१५. साधकांचे सद्वर्तन पाहून गुरूंनी रचलेल्या ‘शुद्ध कल्याण’ या रागातील बंदिश आठवणे
(बंदिश : शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच ‘छोटा ख्याल’, ‘चीज’ असेही म्हणतात. ही मध्यलय किंवा दृत लयीत गातात.)
१५ अ. बंदिश
‘गुमानी तज मान, कर गुनियनकी सांगत
जासो बढे तेरो ग्यान, नाही भरोसो या नरतन को
सोच समझ कर प्रभू को ध्यान’
१५ आ. बंदिशीचा अर्थ
१. गुमानी तज मान : गुमानी = गर्विष्ठ, अहंकारी, तज = त्याग कर, सोड, मान = गर्व, अहंकार. हे अहंकारी मानवा, तू अहंकाराचा त्याग कर.
२. कर गुनियनकी सांगत : तू गुणीजनांची संगत ठेव.
३. जासो बढे तेरो ग्यान : जेणेकरून तुझ्या ज्ञानात भर पडेल.
४. नाही भरोसो या नर तन को : या देहाचा काही भरोसा नाही.
५. सोच समझ कर प्रभू को ध्यान : हे लक्षात घेऊन आता तू ईश्वराचीच आराधना कर. ध्यान कर.
१६. गुरुजींकडून शिकलेल्या रचना केवळ गायिल्या असणे; पण त्या रचनांचा खरा अर्थ ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या माध्यमातून समजणे
या बंदिशींचा अर्थ आणि मला येथे लाभलेली गुणी साधकांची संगत अन् त्यातून मिळालेले ज्ञान तंतोतंत जुळत असल्याचे माझ्या लक्षात आले. माझ्या गुरुजींनी केलेल्या ९९ टक्के रचना भक्तीरसाने ओथंबलेल्या आहेत आणि त्यातील पुष्कळ रचनांमध्ये ‘गुमान’ म्हणजे अहंकाराचा त्याग करण्याचा मनाला उपदेश केला आहे. मी माझ्या गुरुजींकडून ज्या रचना शिकलो, त्या मी केवळ गात होतो; पण त्या रचनांचा खरा अर्थ मला महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून समजला.
१७. स्वतःत झालेले पालट
१७ अ. साधकांच्या सहवासात राहून आचार आणि विचार यांमध्ये पालट होणे : मागील दोन ते अडीच वर्षे मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात संगीताच्या प्रयोगांसाठी येत आहे. मी किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबांच्या आश्रमात संगीत सेवा करण्यासाठी आणि त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी जात आहे. ‘हा काळ माझ्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आहे’, असे मला जाणवते; कारण या २ वर्षांत माझी विचारसरणी आणि आचरण यांत आमूलाग्र पालट झाल्याचे मला जाणवते.
१७ आ. स्वभावदोष अल्प होत असतांना गातांना चांगले ध्यान लागणे, भावजागृती होणे आणि ईश्वराकडे खेचला जात असल्याचे जाणवणे : आश्रमातील साधक बंधू-भगिनी यांचे निरीक्षण करूनच माझ्यातील स्वभावदोष मी दूर करण्याचा प्रयत्न करू लागलो. यातून अतिशय महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात येऊ लागली, ‘जसे माझे स्वभावदोष अल्प होत आहेत, तसे गातांना माझे चांगले ध्यान लागते. माझी भावजागृती चांगली होऊ लागली आहे आणि परिणामी मी ईश्वराकडे खेचला जात आहे’, असे मला जाणवते.
१७ इ. भक्तीरसप्रधान गाण्यांकडे ओढा वाढू लागणे : मला शृंगारिक काव्यांचा वीट येऊन भक्तीरसाकडेच माझा ओढा वाढू लागला. ‘श्री गणेश, दुर्गामाता, शंकर, श्रीराम, श्रीकृष्ण आदी देवतांचीच नावे असलेल्या रचना गाव्यात. या देवतांच्या नावाने नवीन रचना कराव्यात, त्यांचे विविध मंत्र, नामजप विविध रागांत आळवावे’, असे मला वाटत आहे.
१७ ई. ‘संगीत हे ईश्वर प्राप्तीसाठीच आहे’, असे वाटणे : ईश्वराने मला मधुर वाणी दिली आहे. तिचा उपयोग केवळ त्याचेच गुणगान करण्यासाठीच करायला हवा. ‘संगीत हे ईश्वर प्राप्तीसाठीच आहे’, असे मला वाटू लागले. ‘वेदकाळात म्हणत असलेल्या ऋचा, विविध धार्मिक कार्यांत केले जाणारे मंत्रोच्चार, भजन, कीर्तन’ ही आपली संस्कृती आहे’, याची मला जाणीव झाली.
१८. ‘संगीताद्वारे ईश्वरप्राप्ती’, हेच अंतिम ध्येय असल्याचा दृढ निश्चय होणे
मी माझ्या गत आयुष्याकडे दृष्टीक्षेप टाकल्यावर ईश्वराने माझ्यावर वेळोवेळी कृपा करून मला जागरूक करण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येते. ‘केवळ ईश्वरासाठीच गाणे’, हे माझ्या ‘गुसाई’ संगीत परंपरेतील पूर्वजांचे उद्दिष्ट होते, ज्यापासून मी इतकी वर्षे दूर गेलो होतो. मला वेळोवेळी ईश्वर त्याच्याकडे बोलावत होता; पण मीच इकडे-तिकडे भरकटत राहिलो. मी ऐहिक आणि बौद्धीक सुखाच्या मागे धावत होतो. मला संगीतात मिळवलेल्या पदव्यांचा अभिमान वाटायचा. मी करत असलेल्या कार्यक्रमात श्रोत्यांची वाहवा मिळाली की, मी हुरळून जायचो; पण ‘हा आनंद क्षणभंगुर आहे’, हे माझ्या हळूहळू लक्षात आले. माझा बालपणापासूनच ईश्वराकडे ओढा होता. आमच्या घरी माझे आई-वडील असतांना घरात आध्यात्मिक वातावरण होते. पूजा-अर्चा, नामजप करणे, तीर्थयात्रा करणे, वरचेवर चालू असायचे. मी नियमित योगाभ्यास करत असे. ईश्वराने मला ‘योग आणि संगीत’ हे दोन्ही त्याच्याकडे नेणारे सुंदर मार्ग दाखवले. संगीत उपचारात थोडा काळ टिकणार्या आनंदाची प्राप्ती मला होऊ लागली. संगीत उपचाराच्या निमित्ताने मी आश्रमात आलो. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. देवबाबा यांचे मार्गदर्शन अन् येथील संत आणि साधक यांचा सत्संग’, यांमुळे ‘संगीताद्वारेच ईश्वरप्राप्ती’, हेच आपले अंतिम ध्येय आहे’, हे मला कळून चुकले.
दोन वर्षांपूर्वी ‘संगीताचे कार्यक्रम करणे आणि रुग्णांवर संगीतोपचार करणे’, हे माझे ध्येय होते; पण सतत सत्संगात राहून आता ‘संगीताद्वारे ईश्वरप्राप्ती कशी करता येईल ?’, हीच तळमळ मला लागली आहे. ‘त्या दिशेने जाणार्या मार्गावरून देव माझा हात घट्ट धरून मला नेत आहे’, अशी मला सुखद जाणीव होत आहे.
१९. कृतज्ञता
माझ्यासारख्या पामराला ईश्वराकडे जाणार्या या सत्यपथावरून, सन्मार्गावरून वाटचाल करण्यासाठी आशीर्वाद देणारे, सहकार्य करणारे माझे आई-वडील, संगीतातील सर्व गुरुजन, परात्पर गुरु डॉ. आठवले, प.पू. देवबाबा, सर्व संत मंडळी, संत गजानन महाराज आणि सर्वशक्तीमान, सर्वव्यापी परमेश्वर अन् आश्रमातील सर्व साधक बंधू-भगिनी या सर्वांच्याप्रती मी अत्यंत कृतज्ञ आहे.’
(समाप्त)
– श्री. प्रदीप चिटणीस, ठाणे, महाराष्ट्र (२०.३.२०२०)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |