पाकिस्तानमध्ये आता बलात्कार्‍याला नपुंसक करण्यात येणार

पाकिस्तान असे करू शकतो, तर भारत का नाही ? १३० कोटी लोकसंख्या असणार्‍या भारतात प्रतिदिन अनेक महिलांवर बलात्कार केले जातात, त्यानंतर त्यांच्या हत्याही होत असतात. असे असतांना भारताने आतापर्यंत अशी शिक्षा करण्याचा कायदा का केला नाही ?

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये आता बलात्कार प्रकरणातील दोषीला इंजेक्शन देऊन नपुंसक करण्याची शिक्षा करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या कायद्याच्या मसुद्याला पाक सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आले. त्यावर चर्चा करण्यात आल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी मसुद्याला संमती दिली; मात्र सरकारकडून यावर अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही. पाकिस्तानमधील ‘जिओ टीव्ही’ या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

१. दोन मासांपूर्वी लाहोरजवळ एका फ्रेंच महिलेवर तिच्या मुलांसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर पाकमध्ये महिलांनी मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘बलात्कार आणि लैंगिक अत्याचारातील दोषींना नपुंसक करण्याची शिक्षा द्यायला हवी’, असे म्हटले होते.

२. एका इंजेक्शनद्वारे व्यक्तीला नपुंसक करण्याची वैद्यकीय प्रक्रिया आहे. या रासायनिक इंजेक्शनद्वारे व्यक्तीच्या हॉर्मोनवर परिणाम केले जातात. त्यामुळे त्याची लैंगिक क्षमता संपुष्टात येते.