गोव्यात महाराष्ट्रासारख्या कठोर मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी – गोव्यात कोरोना महामारीचा संसर्ग नियंत्रणात आहे. त्यामुळे गोव्यासाठी महाराष्ट्रासारख्या कठोर मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत व्हर्च्युअल माध्यमातून बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांना माहिती देत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांतील कोविड-१९ संसर्गाच्या स्थितीवरून विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘बाहेरून येणार्यांचे ‘थर्मल स्कॅनिंग’ करणे, सामाजिक अंतर पाळणे, मास्कचा वापर आणि इतर उपाययोजना यांच्यावर आमचा भर आहे. समुद्रकिनारी पट्ट्यातील क्लब आणि तेथे होणार्या पार्ट्या यांमध्ये वरील नियमांचे पालन होत नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पंतप्रधानांच्या समवेत झालेल्या चर्चेत कोरोनावरील लस आल्यावर त्याचे वितरण कसे करायचे यावर चर्चा झाली. लस जतन करण्यासाठी वातानुकूलीन यंत्रणा निर्माण करावी लागेल.
४ आठवड्यांत २ लसींचे डोस देण्याचे नियोजन असेल. लस देतांना आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या काळात पुढाकार घेऊन सेवा करणारे, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य व्याधींनी ग्रस्त असलेले यांना प्राधान्य देण्यात येईल.’’ लस जनतेला विनामूल्य दिली जाईल का, याविषयी मुख्यमंत्र्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.