सावधान ! किशोरवयीन मुलांनी नेमका कुणाचा आदर्श घ्यायचा ?
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वयाच्या १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली. संत तुकाराम महाराज यांनीही वयाच्या १४-१५ व्या वर्षाच्या आसपास किंवा त्याही आधी पहिला अभंग रचला असावा. समर्थ रामदास यांचे मनाचे श्लोक जेव्हा त्या काळातील समाजाच्या कानावर पडायला प्रारंभ झाला, तेव्हा त्यांचे वय १० वर्षांपेक्षाही अल्प होते. राजमाता जिजाऊंनी प्रभु श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या कथा सांगत घडवलेले छत्रपती शिवराय यांनी जेव्हा शिवपिंडीवर स्वत:च्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली, तेव्हा त्यांचे वय होते अवघे १४ वर्षे ! धर्मवीर संभाजी महाराज यांनी शास्त्र आणि शस्त्र यांच्या संस्कारात डुंबत ‘बुधभूषण’ नामक ग्रंथ लिहिला, तो वयाच्या १६ व्या वर्षीच ! आर्य चाणक्य यांच्यापासून स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, सावरकर आदींपर्यंत अशी अनेक उदाहरणे आहेत की, ज्यांच्यामध्ये धर्म आणि मातृभूमी यांवरील अफाट प्रेमाने ओतप्रोत भरलेले होते. या सगळ्यांमध्ये समाजाच्या कल्याणाची, प्रगतीची, स्वत:च्या आध्यात्मिक उन्नतीची प्रचंड ऊर्जा होती.
१. आजची किशोरवयीन मुले, हत्या, लफडी, मारामारी यांमध्ये आघाडीवर ! : एकीकडे ऐन तारुण्यात ‘इन्कलाब’ लिहिणारे भगतसिंग, तर दुसरीकडे १८ वर्षांची सुंदर पत्नी आणि ६ मासांचे गोंडस बाळ यांना सोडून देश-धर्म यांसाठी घराबाहेर पडणारे २१ वर्षीय सावरकर ! आख्खी पिढीच अजब; पण आता ! चांगली पिढी जन्माला येण्याचेच संपले आहे कि काय ?, अशी भीती निर्माण झाली आहे. आजची शाळकरी मुले केवळ व्यसन आणि अश्लीलता यांच्याकडे झुकलेली दिसत आहेत. ज्या वयात पूर्वी प्रतिभावान संत जन्माला येत होती, आता त्या वयात वर्तमान काळात गावगुंड निर्माण होत आहेत. १६ वर्षांची मुले व्याभिचार आणि बलात्कार यांसारखे हिडीस प्रकार करतांना आढळून येत आहेत. किशोरवयीन मुले, हत्या, लफडी, मारामारी यांमध्ये आघाडीवर आहेत.
२. गुरुकुल शिक्षण पद्धत बंद झाल्यानेच राष्ट्राची अधोगती ! : शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांच्या हातात सिगारेट असणे अन् तोंडात शिव्या असणे आता अभिमानाचे झाले आहे. ही अशी पिढी उद्या प्रौढ होऊन त्यांच्या पोटी जन्माला येणार्या मुलांवर काय संस्कार करील, याचा विचार न केलेलाच बरा ! वैदिक ग्रंथ सांगतात की, जर एक पिढी बिघडली, तर पुढच्या पाच पिढ्या बिघडतात. मग चांगला समाज निर्माण होणारच कसा ? इंग्रजांनी गुरुकुल शिक्षण पद्धत बंद केली आणि तिथूनच राष्ट्राची अधोगती चालू झाली. मातृभाषेची जागा कमकुवत इंग्रजीने घेतली. मग भारताचा जाज्वल्य इतिहास पुसण्याची सिद्धता चालू झाली. ‘जे वाईट ते या मातीतले आणि जे चांगले ते परकियांचे’, हे आमच्या मनावर बिंबवायला लागले.
३. अधोगतीला सगळ्यात मोठा हातभार सिनेसृष्टीचा ! : आधी आमच्या भाषेवर, मग इतिहास, नंतर सण, त्यानंतर देवादिकांवर आणि आता देशावर गेली अनेक शतके इतकी आक्रमणे का ? या सगळ्यामुळे जन्माला येत असलेली पिढी ईश्वराला नाकारणारी आसुरी सिद्ध होऊ लागली आणि पाश्चात्त्य शिक्षण देणार्या विद्यापिठांमधून कन्हैय्या कुमारसारखे अक्कलशून्य देशद्रोही निर्माण झाले. आमचे संस्कार आणि आदर्श पालटले. जिजाऊ, राणी पद्मिनी यांच्या जागी सनी लिओन, आलिया भट या आताच्या पिढीच्या आदर्श झाल्या आहेत. या अधोगतीला सगळ्यात मोठा हातभार लावला तो सिनेसृष्टीने ! या सिनेमांनी पहिला आघात अभिजात संगीतावर, त्यानंतर मंदिरे भ्रष्टाचाराची केंद्रे दाखवून कबर आणि ‘गॉड’ यांना मोठे करून त्यांना माध्यम केले.
४. अखंड असावे सावधान ! : सध्याचे चित्रपट आम्हाला ब्ल्यू फिल्म पहाणे गैर नाही, प्रेमात पडणे म्हणजेच उदात्तीकरण, हातात सिगारेट आणि मद्याचा पेला असणे, हे आपण उच्चभ्रू असल्याचे मानांकन समजले जात आहे. आज एखाद्या तरुणीला ‘बॉयफ्रेंड’ (मित्र) किंवा तरुणाला ‘गर्लफ्रेंड’ (मैत्रीण) नसणे, हे अपमानास्पद मानले जाते. चित्रपटातून लहान वयातील प्रेम दाखवून राष्ट्रपती पारितोषिक मिळते. अशा चित्रपटांना राष्ट्रीय पारितोषिक घोषित करून शासन समाजावर नेमके कोणते संस्कार करत आहे ? या पारितोषिकांचा हेतू काय ? यातून नेमके आताच्या पिढीची कोणती उन्नती होणार आहे ? दोन पिढ्यांमधील फरक ठळकपणे जाणवतो. एक उत्कर्षाकडे जाणारी आणि दुसरी अधोगतीकडे जाणारी, संभ्रम, संभ्रम आणि फक्त संभ्रम !
यातून दोनच गोष्टी कळत आहेत, आपला देश विदेशी शिक्षणाचे इंधन भरून, टॉप गिअर टाकून अधोगतीकडे चालला आहे, आणि दुसरे समर्थ रामदासांचे शब्द २४ घंटे डोक्यात रेंगाळत आहेत, ते म्हणजे… अखंड असावे सावधान !
संदर्भ – संकेतस्थळावरून (२२.५.२०१६)