नियमांचे उल्लंघन करत वाढदिवस साजरा करणार्या भाजप नगरसेवकावर गुन्हा !
नवी मुंबई – वाढदिवसानिमित्त मेजवानीचे आयोजन करून गर्दी केल्याने पोलिसांनी खारघरमधील भाजपचे नगरसेवक नीलेश बाविस्कर यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. कोरोनाच्या संदर्भातील शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली.
२२ नोव्हेंबरच्या रात्री नीलेश बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रात्री विलंबापर्यंत ही मेजवानी चालू असल्याने काही नागरिकांनी खारघर पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे तक्रारी केल्या. या तक्रारींनुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. (नागरिकांनी तक्रारी करेपर्यंत पोलीस झोपा काढत होते कि बहिरे झाले होते ? स्वत:हून कारवाई करणारे पोलीस हवेत ! – संपादक ) नागरिक आपल्यावरील प्रेमापोटी शुभेच्छा देण्यासाठी आले होते. आपण कुठल्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन केले नाही. आपण कोणत्याही प्रकारच्या मेजवानीचे आयोजन केले नव्हते, तसेच गर्दीही झाली नव्हती, असा दावा बाविस्कर यांनी केला आहे.