सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी आढाव्यासाठी त्यांच्या खोलीत गेल्यावर ते स्वतः आणि त्यांची खोली यांविषयी जाणवलेली सूत्रे
‘सद्गुरु राजेंद्र शिंदे देवद आश्रमातील काही साधकांच्या साधनेचा आढावा त्यांच्या खोलीत घेतात. त्यांच्या खोलीत बसल्यावर सद्गुरु राजेंद्र आणि त्यांची खोली यांविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. या सूत्रांप्रमाणे देवद आश्रमातील अनेक साधकांनी थोड्या फार प्रमाणात असे अनुभवले आहे.
१. सद्गुरु दादांची खोली म्हणजे पोकळी असल्याचे जाणवणे आणि खोलीत असतांना वेगळ्याच विश्वात गेल्याचे अनुभवता येणे
‘सद्गुरु दादांंच्या खोलीत गेल्यावर एखाद्या पोकळीत गेल्यासारखे वाटते. त्यामुळे आम्हाला बाह्य जगाचे किंवा खोलीबाहेरील आश्रमजीवनाचे भानच रहात नाही. ‘आम्ही सर्वजण एका वेगळ्याच विश्वात किंवा उच्च लोकात गेलो आहोत’, असे अनुभवता येते. सद्गुरु दादांच्या खोलीत गेल्यावर माझ्यासारख्या आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांना स्वतःचे अस्तित्वच रहात नाही. आम्ही काय बोलतो, काय विचार करत असतो, याचेही आम्हाला भान नसते.’ – सौ. आनंदी पांगुळ (११.११.२०२०))
२. सद्गुरु दादांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवच बोलत असल्याचे जाणवून गुरुतत्त्व अनुभवता येणे
‘आढाव्याच्या वेळी त्यांच्या बोलण्यातून गुरुतत्त्वाची अनुभूती घेता येते. सद्गुरु दादा आढाव्यात बोलत असतांना अनेकदा असे वाटते की, जणू त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवच बोलत आहेत. सद्गुरु दादांच्या काही हालचालींतून किंवा त्यांच्या तोंडवळ्यावरील हावभावातून साक्षात् गुरुदेवांच्याच हालचालींचा भास होतो.
३. मन किंवा बुद्धी यांच्या स्तरावर ठरवल्याप्रमाणे आढाव्यातील सूत्रे कधीच न होणे आणि प्रत्येक वेळी ‘ईश्वरी नियोजनानुसारच आढावा होत आहे’, याची प्रचीती येणे
आढाव्यापूर्वी मन किंवा बुद्धी यांच्या स्तरावर बरेच काही ठरवलेले असते. ‘आज आढाव्यात ‘हे होईल’ किंवा ‘सद्गुरु दादा असे सांगतील’, असेही वाटत असते; परंतु आढावा चालू झाल्यावर वेगळेच घडत जाते. ‘आम्ही काहीतरी ठरवल्याप्रमाणे घडले’, असे आजपर्यंत एकदाही झालेले नाही. प्रत्येक वेळी ‘ईश्वरी नियोजनानुसारच आढावा होत आहे’, याची प्रचीती येते. त्यामुळे प्रत्येक आठवड्यातील आढावा हा नाविन्यपूर्णच असतो.
४. आढाव्याच्या कालावधीत खोलीत सगुण-निर्गुण अशा स्थितीचे टप्पे अनुभवता येणे
आम्ही आढाव्यासाठी त्यांच्या खोलीत जातो, तेव्हा ‘सगुण’ स्थिती अनुभवता येते, आढावा चालू झाल्यावर हळूहळू ‘सगुण-निर्गुण’ असे जाणवते. सद्गुरु दादांनी बोलायला प्रारंभ केल्यावर हळहळू निर्गुण-सगुण स्थिती जाणवते आणि आढाव्याच्या शेवटच्या टप्प्यात पूर्णच निर्गुण स्थिती अनुभवता येते. ‘ती स्थिती संपूच नये’ किंवा ‘आढावा संपल्यावर खोलीतून बाहेर पडूच नये’, असे वाटते. सद्गुरु दादांनी दिलेल्या चैतन्यदायी सत्संगामुळे भारावून गेल्यासारखे वाटते.
५. खोलीतील परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहिल्यावर त्यांचे साधकांच्या साधनेकडे लक्ष असल्याचे जाणवून अंगावर रोमांच येणे
त्यांच्या खोलीतील परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्रही पुष्कळ बोलके आहे. आढाव्याच्या वेळी ‘त्यांचेही आमच्या साधनेकडे लक्ष आहे. ते त्या छायाचित्राच्या माध्यमातून आमच्याशी बोलत आहेत’, असे वाटते. त्या वेळी अंगावर रोमांच येतात.
६. आढावा संपल्यावर सकारात्मक ऊर्जा मिळणे
आढावा संपल्यावर पुष्कळ प्रभारित (चार्ज) झाल्यासारखे वाटते. पुढील प्रयत्नांसाठी पुष्कळ सकारात्मक ऊर्जा मिळते आणि त्रासदायक शक्तीचे आवरण जाऊन उत्साह वाटतो.
७. ‘त्यांच्या खोलीत चैतन्याचा अफाट स्रोत आहे’, असेही जाणवते. ‘त्या चैतन्याच्या बळावरच आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांवर मात करता येईल’, असे वाटते.
साधकांना साधनेत पुढे नेण्याची तळमळ असणार्या आणि व्यष्टी आढाव्याच्या माध्यमातून सातत्याने प्रेरणा देऊन सकारात्मक करणार्या सद्गुरु दादांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.११.२०२०)
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |