कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर महाराष्ट्रासह ४ राज्यांना अहवाल सादर करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
नवी देहली – सर्वच राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आम्ही ऐकत आहोत. त्यामुळे सर्व राज्यांनी सद्यपरिस्थितीचा अहवाल सादर करावा. राज्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती सिद्धता केली नाही, तर डिसेंबरमध्ये परिस्थिती यापेक्षाही भयंकर होऊ शकते. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि रुग्णांच्या हाताळणीच्या संदर्भात देहली, आसाम, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांनी २ दिवसांत अहवाल सादर करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. कोरोना रुग्णांवरील उपचार आणि मृत्यू झालेल्या मृतदेहांच्या हाताळणीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा आदेश दिला. ‘सण-उत्सवांच्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढून दुसरी लाट येऊ शकते’, अशी चेतावणी यापूर्वीच केंद्रीय समितीने दिली होती. तशीच परिस्थिती देशात निर्माण होत आहे. त्यामुळेच न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.
न्यायालयाने देहली राज्याची बाजू मांडणारे महाअधिवक्ता संजय जैन यांना ‘देहलीतील परिस्थिती नोव्हेंबरमध्ये अधिक बिकट झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याचा अहवाल सरकारने सादर करावा’, असा आदेश न्यायालयाने दिला. ‘कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत’, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.