पंचतारांकित हॉटेलमधून निवडणुका लढवल्या जात नाहीत ! – गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला घरचा आहेर

काँग्रेसचे हे एक छोटेसेच रूप आझाद यांनी सांगितले. वास्तविक संपूर्ण काँग्रेस जनतेपासून दूर गेली आहे, ही वस्तूस्थिती आहे !

गुलाम नबी आझाद

नवी देहली – आमच्या नेत्यांची मुख्य समस्या म्हणजे तिकीट मिळाल्यानंतर सर्वांत आधी ते पंचतारांकित हॉटेल आरक्षित करणार. तिथेही त्यांना डिलक्स खोली हवी असते. वातानुकूलित चारचाकीविना ते बाहेर पडणार नाहीत. रस्ते चांगले नाहीत अशा ठिकाणी ते जाणार नाहीत. पंचतारांकित हॉटेलमधून निवडणुका लढवल्या जात नाहीत. जोपर्यंत ही संस्कृती पालटत नाही, तोपर्यंत आपण जिंकणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. (आझाद यांनी काँग्रेसने निवडणुकीत विजय मिळवण्याची आशा आता सोडून देऊन तिचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला, तरी पुरेसे आहे, असेच जनतेला वाटते ! – संपादक) काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे अन्य एक ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री कपिल सिब्बल यांनीही पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती.

आझाद पुढे म्हणाले की, अनेक जण नेतृत्वाला दोष देत आहेत; पण ब्लॉक किंवा जिल्ह्यातील नेत्यांचा सर्वसामान्यांसमवेतचा संपर्क तुटला आहे. जेव्हा कोणाला पद मिळते, तेव्हा ते लेटर पॅड, व्हिजिटिंग कार्ड छापतात आणि आपले काम संपले, असे समजतात; मात्र येथेच खर्‍या अर्थाने कामाला प्रारंभ होते.