किल्ले रायगडवर दुसरा ‘रोप वे’ उभारणार ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले
रायगड – स्वराज्याची राजधानी अशी जगभरात ओळख असलेल्या किल्ले रायगडावरील ‘रोप वे’ वादाच्या भोवर्यात सापडल्याने काही मासांपासून ही सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गडावर येणार्या शिवभक्त आणि पर्यटक यांचे हाल होत आहेत. अस्तित्वात असलेले ‘रोप वे’ प्रशासन मनमानी कारभार करत असून आतापर्यंत त्यांनी पुरातत्व विभागासमवेत अधिकृत करारसुद्धा केलेला नसल्याची धक्कादायक गोष्ट खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितली आहे. यापुढे ‘रोप वे’ची मनमानी सहन केली जाणार नाही, तसेच रायगडावर नव्याने दुसरा ‘रोप वे’ प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी २० नोव्हेंबर या दिवशी महाड येथील पत्रकार परिषदेत केली.
प्राधिकरणात समावेश असलेल्या गावांतील रस्त्यांची कामे जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सातपुते यांनी दिली. महाड-रायगड मार्गाचे काम योग्य पद्धतीने न करणार्या ठेकेदाराकडून हे काम काढून घेण्यात आले आहे. त्याला काळ्या यादीत टाकण्यात आले असून नवी निविदा प्रक्रिया चालू करण्यात आली असल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे.